पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी  मेधा कुलकर्णी यांनी घेतली अमित शहा यांची भेट

पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी मेधा कुलकर्णी यांनी घेतली अमित शहा यांची भेट

                                               
पुणे: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मुर्त्यमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, जगदाळे यांची कन्या व हल्ल्यातील पीडित आसावरी यांना शासकीय नोकरीत रुजू करून घ्यावे, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. नवी दिल्ली येथे अमित शहा यांची भेट घेऊन यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती करणारे निवेदन मेधा कुलकर्णी यांनी दिले. 
मेधा कुलकर्णी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी यासंदर्भात विनंती केली असून, या दुर्दैवी घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगदाळे कुटुंबाला मदतीचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने त्यांची कन्या आसावरी जगदाळे हिला सहानुभूती तत्त्वावर शासकीय नोकरी देण्याचे सांगण्यात आले होते.
 
आसावरी जगदाळे या शैक्षणिकदृष्ट्या पात्र असून, त्यांनी भारती विद्यापीठ येथून मानव संसाधन व्यवस्थापनात (एचआर) एमबीए, तसेच एच. व्ही. देसाई महाविद्यालयातून संगणकशास्त्र विषयात बी.एस्सी. पदवी घेतली आहे. तसेच खासगी क्षेत्रातील अनुभवही त्यांच्याकडे आहे. त्यांना सामान्य प्रशासन विभागातील वर्ग-२ प्रशासकीय अधिकारी पद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, नऊ महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही आणि कुटुंबाने वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही औपचारिक माहिती किंवा प्रगती कळविण्यात आलेली नाही. या विलंबामुळे कुटुंबाला मानसिक त्रास व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.

पूर्वी आश्वासन दिलेल्या पदावर किंवा पर्यायी स्वरूपात पात्रतेनुसार पुणे महापालिका किंवा राज्य शासन सेवेत योग्य नोकरी देण्याचा विचार करावा, अशी मागणी करत या प्रकरणात तातडीने योग्य कार्यवाही करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.