एसटी महामंडळ विरोधात युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन

एसटी महामंडळ विरोधात युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन

एसटी महामंडळ विरोधात युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन
पुणे विभागातील २०१९ च्या चालक-वाहकांची प्रलंबित सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी
 
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील चालक व वाहक पदासाठीची २०१९ पासून प्रलंबित सरळ सेवा भरती प्रक्रिया तात्काळ सुरु करावी, वैद्यकीय चाचणी झालेल्या उमेदवारांची ट्रायल पूर्ण करून पुणे विभागाची अंतिम निवड यादी जाहीर करावी, प्रशिक्षण काळात गाड्यांची संख्या वाढवावी, या मागण्यांसाठी एसटीच्या विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या आवारात पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. 
 
पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धरणे आंदोलनात वैद्यकीय चाचणी झालेले २५०-३०० उमेदवार, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान अहमद खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, पुणे शहर काँग्रेस प्रभारी विजयसिंह चौधरी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, प्रदेश सचिव राजू ठोंबरे, संतोष पाटोळे, वाहिद नीलगर, अक्षय माने, केतन जाधव, प्रसाद वाघमारे, अजित ढोकळे, मुरली बुद्धाराम, विकार शेख, रमेश  कांबळे, सुजित गोसावी, आदिनाथ जावीर आदी उपस्थित होते. एसटी महामंडळाचे प्रभारी विभागीय नियंत्रक कैलास पाटील यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
 
राहुल शिरसाठ म्हणाले, “एसटी महामंडळाने २०१९ मध्ये १२ विभागांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली. मात्र, पुणे विभागात वैद्यकीय चाचणी होऊनही ट्रायल न झाल्याने, तसेच ट्रायल ट्रॅक नसल्याने त्यांची भरती प्रक्रिया चार वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे ट्रायल लवकरात लवकर घेऊन ही भरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी नियंत्रकांकडे केली. या मागणीला सकारात्त्मक प्रतिसाद मिळाला असून, येत्या ५ तारखेपासून ट्रायल सुरू करण्याचे आश्वासन विभागीय नियंत्रकांनी दिले आहे.” शिरसाठ यांच्या पुढाकाराने या तरुणांना न्याय मिळाला, असे सांगत एहसान अहमद खान यांनी शिरसाठ यांचे कौतुक केले.
 
उमेदवार मोबीन शेख म्हणाले, “पुणे विभागात १६४७ पदांसाठी ही भरती होती. अकरा विभागांची भरती पूर्ण झाली असून, पुणे विभागात ती रखडली आहे. ही भरती प्रक्रिया लवकर सुरु करावी, तसेच प्रशिक्षणासाठी बस उपलब्ध कराव्यात, ट्रायल ट्रॅक सुरु करावा, मुलांच्या अंतिम याद्या जाहीर कराव्यात, यासाठी अनेकवेळा आंदोलन केले. आझाद मैदानावर केलेल्या उपोषणानंतर महाव्यवस्थापकांनी परिपत्रक काढले होते. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नव्हती. युवक काँग्रेसच्या सहकार्याने आज केलेल्या आंदोलनामुळे विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून ५ जुलैपासून भरती प्रक्रिया सुरु करण्याचे आश्वासन दिल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे.”
———————–
“चालक व वाहक पदासाठी २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबवली होती. त्यांची दुसरी चाचणी ट्रायल ट्रॅकवर होते. मात्र, कोरोना काळात ट्रॅक खराब झाल्याने ती चाचणी प्रलंबित राहिली. आता ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या आठ दिवसात ट्रायल घेण्यास सुरुवात होईल व लवकरच अंतिम यादीही जाहीर केली जाईल.”
– कैलास पाटील, प्रभारी विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे विभाग
 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *