पुणे : महाकवी कालिदास रचित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अनुवादित मेघदूत या महाकाव्यावर आधारित काव्य, स्वर आणि ताल या त्रिबंधातील ‘संगीत मेघदूत’ सांगीतिक महोत्सवाने आषाढाचा पहिला दिवस साजरा झाला. कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे सदाशिव पेठेतील नारद मंदिरात हा श्रवणीय कार्यक्रम आयोजिला होता. दरवर्षी आषाढाच्या पहिल्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
वनस्पती शास्त्रज्ञ व कवी डॉ. मंदार दातार आणि संगीतकार अमोल काळे यांच्या कल्पनेतून ‘संगीत मेघदूत’ साकार झाले आहे. कार्यक्रमात अमोल काळे, विजय काळे, स्वामिनी कुलकर्णी यांनी गायन केले. गायनासह स्वामिनीने सिंथेसायझरवर पार्श्वसंगीत दिले. महेश कुलकर्णी, रुद्र जोगळेकर व अनघा फाटक यांनी तबल्याची साथसंगत केली. तालवाद्द्यावर ओवी काळे, मोहिनी कुलकर्णी यांनी साथ केली. यक्ष वाचन गौरव बर्वे यांनी केले.