श्री ज्ञानेश्वरीचे लेखी पारायण सातासमुद्रापार

श्री ज्ञानेश्वरीचे लेखी पारायण सातासमुद्रापार

अठरा देशांतील भाविकांना भक्तीची ओढ; तीस हजार जण एकाच वेळी सहभागी

पुणे: नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवायी या संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या अभंगाप्रमाणेच महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या थराज श्री ज्ञानेश्वरांच्या लेखपारायणाचा आगळा अनुभव भाविक पेत आहेत. केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगभरातील अनेक देशांतील मिळून एकाच वेळी तीस हजार भाविकांचे लेखी पारायण सुरू आहे. त्यामुळे मावलीनी सांगितलेला विश्वात्मक भावाची प्रचिती या उपक्रमाच्या माध्यमातून येत आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा आगळा उपक्रम राबविण्यात आला असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. इंग्लंड, अमेरिका जर्मनी, जपान, रशिया, फिलिपिन्स, सिंगापुर, मलेशिया, स्वित्झर्लंड नेदरलँड, ओमेन, सौदी अरेबिया, इटली, ऑस्ट्रेलिया यांसह १८ देशांतील विदेशी भाविकांना या पारायणाची गोडी लागली आहे.
श्री ज्ञानेश्वरीची प्रत आणि लिखाणासाठी वही कुरिअरने पाठविण्यासाठी प्रत्येकी सतराशे ते दोन हजार रुपये खर्च आला. ते इंग्रजीत पारायण करीत आहेत.

संतोष महाराज पायगुडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम सध्या भाविकांमध्ये प्रेम आणि श्रद्धा वृद्धिंगत करणारा आहे. संतोष महाराज पायगुडे (मांडवी), निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री (रिहे), बाळासाहेब खरमाळे महाराज (खोडद), शेखर महाराज जांभूळकर (हिंजवडी) आणि श्रुतकीर्ती ताई धस (आळंदी) यांच्या प्रयत्नातून ही सेवा होत आहे. माऊलींच्या समाधीसमोर २५ ओव्या वाचन करून आणि अजान वृक्षाच्या छायेखाली २५ ओव्या लिहून सुरू झालेल्या या उपक्रमाला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. लिखाणाच्या साहित्य खरेदीला अनेक मंडळींनी मदतीचा हात देऊ केला.

दोन हजार कैदी करणार पारायण

पुणे मध्यवर्ती येरवडा कारागृह प्रशासनाशी पारायण समन्वय समितीचे बोलणे झाले असून, त्यांना कारागृह प्रशासनाने होकार दर्शविल्याने कारागृहातील तब्बल दोन हजार कैद्यांना या लेखी पारायण सोहळ्यात सहभागी करून घेता येणार आहे. त्यांना श्री ज्ञानेश्वरीच्या प्रती आणि वह्या व इतर साहित्य लवकरच पुरविण्यात येणार आहे.

सोशल मीडियावरून भाविकांचा समन्वय

देशी-विदेशी भाविकांचे व्हॉट्सअपचे हजारो ग्रुप तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये एका प्रवचनकारावर मार्गदर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विदेशी भाविकांना पारायणाचे साहित्य पाठविण्यासाठी व मार्गदर्शनासाठी मुंबईतील टीम कार्यरत आहे. ते डिजिटल फ्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या भाविकांच्या संपर्कात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *