कामगार चळवळीला जिवंत ठेवण्याची आवश्यकता

कामगार चळवळीला जिवंत ठेवण्याची आवश्यकता

यशवंतभाऊ भोसले यांचे प्रतिपादन; किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनचा ५२ वा वर्धापनदिन

पुणे : “कामगार हा कंपनीचा कणा असतो. देशाच्या प्रगतीसाठी उद्योग चालवले जात असतील, तर कामगारांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. कामगार कायद्यांमधील बदल, खाजगीकरण यामुळे कामगार देशोधडीला लागत आहे. अनेक कंपन्या वेतन देताना, करार करताना कामगारांची पिळवणूक करत आहेत. त्यामुळे कामगारांना सशक्त बनवणारे कामगार कायदे आणण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी केले. कामगार चळवळ अधिक सक्षम व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनच्या ५२ व्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात भोसले होते. डहाणूकर कॉलनीतील युनियनच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत खुरपे होते. यावेळी किर्लोस्कर कमिन्स कंपनीचे प्लांट हेड राजेंद्र कुलकर्णी, संचालक (एचआर) अजित तलरेजा, प्रमुख (एचआर) शिवांभर सिंग, युनियनचे अध्यक्ष महेंद्र बालवडकर, उपाध्यक्ष बापू सरोदे, डॉ. दत्ता कोहिनकर आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त, २५ वर्षे सेवा बाजवलेल्या आणि विशेष प्राविण्य मिळवलेल्या कामगारांचा सत्कार करण्यात आला.

यशवंतभाऊ भोसले म्हणाले, “खाजगीकरणामुळे २००४ मध्ये किर्लोस्कर कमिन्समध्ये २२०० कामगार कायमस्वरूपी तत्वावर होते. आज केवळ ४९५ कामगार या सेवेत आहेत. कामगारांच्या मुलांना सेवेत सामावून घ्यावे. महागाई वाढली, पण पगार जेमतेम असल्याने गरीब व श्रीमंत दरी वाढली. ही स्थिती अशीच राहिली, तर समाजात स्तोम माजेल. किर्लोस्कर कमिन्स कंपनीला मोठा इतिहास, परंपरा आहे. त्यानुसार कामगारांचे हित जपण्याला कंपनीने प्राधान्य द्यावे आणि कामगारांच्या कराराचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा.”

“कामगारवर्गाला गुलामगिरीच्या अवस्थेतून बाहेर काढण्याचे काम नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले. कामगारांना दिलेले स्वातंत्र्य, हक्क अबाधित ठेवण्याचे दायित्व आपल्यावर आहे. मालक, व्यवस्थापन व कामगार यांच्यातील समन्वय व सौहार्दाचे वातावरण सर्वांसाठी पोषक असते. त्यामुळे कामगारांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना चांगल्या सोयीसुविधा, वेतन कंपन्यांकडून मिळाले पाहिजे,” असेही भोसले यांनी नमूद केले. भोसले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कंपनीचे प्लांट हेड कुलकर्णी व एचआर संचालक अजित तलरेजा यांनी येत्या १५ दिवसांत करार करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

श्रीकांत खुरपे म्हणाले, “कामगारांच्या हितासाठी संघटन महत्त्वपूर्ण असते. व्यवस्थापन व कामगार यांच्यात सौहार्द राहावे यासाठी युनियन गरजेची आहे. दोन्ही बाजूनी पारदर्शीपणा व प्रामाणिकपणा जपायला हवा.” महेंद्र बालवडकर म्हणाले, “वर्धापन दिनानिमित्त रक्तदान व अन्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ३०७ कामगारांनी रक्तदान केले. कामगार व कंपनी यांच्यातील करार लवकरात लवकर व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”

अधिक तलरेजा, राजेंद्र कुलकर्णी यांनीही मनोगते व्यक्त केलेली. नीलेश कथोरे यांनी सूत्रसंचालन केले. विजय भिलारे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *