मुळशी शिवसेना महिला आघाडीतर्फे ज्योतीताई नितीन चांदेरे यांचा पुढाकार…
पुणे: लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मातोश्री फाऊंडेशन, सुसगाव आणि शिवसेना महिला आघाडीतर्फे ज्योतीताई नितीन चांदेरे यांच्या वतीने सुस येथे मूर्ती विसर्जन व फिरते संकलन वाहनाचे आयोजन करण्यात आले होते.
याविषयी अधिक माहिती देताना मातोश्री फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती चांदेरे म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व घाटांवर मूर्ती विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली. परंतु, नागरिकांच्या भावनेचा विचार करत सुस परिसरातील सर्वांसाठी मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी जनसंपर्क कार्यालयसमोरील जागेमध्ये गणेशमूर्ती विसर्जन व संकलन केंद्राची सुविधा देण्यात आली तसेच ज्या नागरिकांना बाहेर कुठे विसर्जन करता येत नाही अशांसाठी फिरते विसर्जन वाहन सुविधा देण्यात आली आहे.
केंद्रामध्ये गणरायाची आरती करण्यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला होता. विसर्जनासाठी पाण्याचे दोन हौद तयार करण्यात आले होते. तसेच लोकभावनेचा आदर करून केंद्रामध्ये संकलित व विसर्जित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती महापालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणी विसर्जित केल्या जाणार आहेत. आतापर्यंत जवळपास १७८० पेक्षा अधिक भाविकांनी या योजनेचा लाभ घेतला असून सुसगाव व परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. तसेच विसर्जन केंद्रांवर येताना नागरिकांनी सर्व शासकीय नियमांचे पालन केले असल्याचे चांदेरे यांनी सांगितले.