वंचित विकासतर्फे विलास चाफेकर लिखित ‘यशोमंदिराचा पाया’ पुस्तकाचे प्रकाशन

वंचित विकासतर्फे विलास चाफेकर लिखित ‘यशोमंदिराचा पाया’ पुस्तकाचे प्रकाशन

‘स्वयंसेवक’ सामाजिक संस्थेच्या कार्याचा पाया : जावडेकर

पुणे : “जमवलेली माणसे हीच संपत्ती मानून रात्रंदिन वंचित घटकांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या विलास चाफेकर यांनी स्वयंसेवकांचे मोठे जाळे तयार केले. निःस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा पाया भक्कम असेल, तर सामाजिक संस्थेचे कार्य चांगल्या पद्धतीने उभे राहते,” असे प्रतिपादन लेखिका कल्पना जावडेकर (kalpana Javadekar) यांनी केले.
 
जाणीव संघटना (Janeev Sanghatana) व वंचित विकास (Vanchit Vikas) संस्थेचे संस्थापक स्वर्गीय विलास चाफेकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनी त्यांनी अखेरच्या दिवसांत लालबत्ती विभागातील (Red Light Area) दवाखाना व सल्ला, मार्गदर्शन केंद्राचे काम मांडण्याकरिता लिहिलेल्या ‘यशोमंदिराचा पाया-खऱ्या शिल्पकार स्वयंसेविका’ या पुस्तकाचे प्रकाशन जावडेकर व जनरल फिजीशिएन डॉ. हेमंत मांजरेकर यांच्या हस्ते झाले. 
 
नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या सोहळ्यावेळी वंचित विकासचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, संचालिका मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर आदी उपस्थित होते. कल्पना कांबळे, रेणुका कोडखणी, बी पन्ना, पार्वती अत्तुर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यकर्त्या मीनाक्षी नवले आणि पुस्तकाचे काम पूर्णत्वास नेण्यात योगदान देणाऱ्या चैत्राली वाघ यांचा सत्कार करण्यात आला.
 
विविध संस्थांच्या माध्यमातून चाफेकरांनी उभारलेले कार्य आणि पुस्तकाविषयी हळव्या आठवणी सांगताना उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू तरळत होते. संस्थेसाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरणारे आहे, अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
 
डॉ. हेमंत मांजरेकर यांनी चाफेकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला. मीना कुर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. तृप्ती फाटक यांनी वंचित विकास संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *