पुणे : वंचित विकास संस्थेतर्फे विपरीत परिस्थितीवर मात करून ‘पुनश्च हरिओम’ करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरु झाले. मंगळवारपर्यंत (दि. १५) सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. नगरसेविका ऍड. गायत्री खडके व माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रसंगी वंचित विकास संस्थेच्या मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात छोट्या व्यावसायिकांना वंचित विकास संस्थेकडून त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी अर्थसाह्य केले होते, त्यांचे तसेच छोट्या व्यावसायिकांच्या (प्राधान्याने स्त्री व्यावसायिकांची) उत्पादनांचे प्रदर्शन भरविले आहे. एकूण २५ स्टॉल असून यामध्ये खाद्यपदार्थ, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, ज्वेलरी, पर्स, बॅग्ज, हार्बल कॉस्मेटिक्स, सेंद्रिय भाजी, धान्य, गिर गाईचे तूप, मेंदी इ. चा समावेश आहे. तसेच ई-वेस्ट व सामाजिक संस्थेची माहिती देणारे स्टॉल आहेत.
व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत वंचित विकास संस्थेने त्यांना आधार दिला आहे. आता कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर हे व्यावसायिक जिद्दीने उभे राहताहेत, ही आनंदाची बाब आहे. पुणेकर नागरिकांनी अशा छोट्या व्यावसायिकांच्या प्रदर्शनाला प्रतिसाद देऊन, त्यांच्याकडून उत्पादने खरेदी करावीत व त्यांना हातभार लावावा, असे आवाहन ऍड. गायत्री खडके व माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले.