होप फाउंडेशनतर्फे चार तरुण गुणवंत अभियंता महिलांना श्री. प्रल्हाद पी. छाब्रिया स्मृती पारितोषिक’ जाहीर

होप फाउंडेशनतर्फे चार तरुण गुणवंत अभियंता महिलांना श्री. प्रल्हाद पी. छाब्रिया स्मृती पारितोषिक’ जाहीर

डॉ. साक्षी ढाणेकर, शताक्षी सिंग तोमर यांना प्रथम, तर डॉ. नितु जॉर्ज, नुपूर कुलकर्णी यांना द्वितीय क्रमांक

प्रथम क्रमांकासाठी १.२५ लाख, तर द्वितीय क्रमांकासाठी ५० हजारांचे पारितोषिक, मानपत्र व मानचिन्ह

पुणे : फिनोलेक्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक प्रल्हाद पी. छाब्रिया यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारे ‘श्री. प्रल्हाद पी. छाब्रिया स्मृती पारितोषिक’ चार तरुण गुणवंत अभियंता महिलांना जाहीर करण्यात आले. होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरसह इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिअरिंग (आयईईई) इंडिया कौन्सिल आणि वुमेन इन इंजिनीअरिंग अ‍ॅफिनिटी ग्रुप यांच्या वतीने ही पारितोषिके देण्यात येतात.

आयआयटी जोधपूर(IIT JODHPUR) येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. साक्षी ढाणेकर यांना बेस्ट वुमेन प्रोफेशनल गटातून, तर शताक्षी सिंग तोमर हिला उत्कृष्ट विद्यार्थिनीमंधून यंदाचे प्रथम क्रमांकाचे ’प्रल्हाद पी. छाब्रिया पारितोषिक’ जाहीर झाले आहे. त्याचे स्वरूप सव्वा लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. हिताची एनर्जी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस येथील संशोधक डॉ. नितु जॉर्ज यांना, तर विद्यार्थिनींमधून नुपूर कुलकर्णी यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले. त्याचे स्वरूप ५० हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

स्व. प्रल्हाद पी. छाब्रिया यांच्या जयंतीदिनी सहावा ‘फाउंडर्स डे’ साजरा करण्यात आला. हिंजवडी येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (आयस्क्वेअरआयटी) कॅम्पसमध्ये, तसेच व्हर्च्युअल स्वरूपात झालेल्या कार्यक्रमावेळी केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य व लेखक अरुण मायरा हे प्रमुख पाहुणे म्हणून दृक्श्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते. तर आयईईई इंडिया कौन्सिलचे चेअरपर्सन डॉ. सुरेश नायर, पुणे सेक्शनचे चेअरपर्सन गिरीश खिलारी, वुमेन इन इंजिनीअरिंग अ‍ॅफिनिटी ग्रुपच्या डॉ. शैलजा पाटील, होप फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि प्रल्हाद छाब्रिया यांच्या कन्या अरुणा कटारा, व्यवस्थापकीय विश्वस्त अमृता कटारा आदी उपस्थित होते.

भारत हा युवकांचा देश आहे. विकासाच्या प्रक्रियेत युवकांचे योगदान अतिशय मोलाचे असून, सर्वच क्षेत्रात तरुण मंडळी उल्लेखनीय काम करत आहेत, याचा आनंद वाटतो. अल्पावधीत आपल्या करिअरमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या, तसेच महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन जाणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी हे पारितोषिक देण्यात येते. अशा प्रोत्साहनपर उपक्रमामुळे युवकांना प्रेरणा मिळेल. या चारही तरुण अभियंत्यांकडून येत्या काळात चांगले काम होईल, असा आशावाद अरुण मायरा यांनी व्यक्त केला.

तरुण, धाडसी आणि उद्योजक महिलांना, मुलींना शिक्षणासाठी प्रल्हाद छाब्रिया सातत्याने प्रोत्साहन देत असत. महिला पुरुषांपेक्षा अधिक सक्षम असल्याचा त्यांना विश्वास होता. त्यांना जी संधी मिळेल, त्याचे सोने करण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे ते नेहमी म्हणत. महिला आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी करत नाहीत, तर समाज आणि देशाच्या उभारणीत योगदान देतात, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण नेहमी दिली, अशा शब्दांत अरुणा कटारा यांनी आपल्या वडिलांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *