औषधी आहाराचा कोविडमध्ये वापर व्हावा : वैद्य पांडकर
वैद्य पांडकर म्हणाले, आयुर्वेदात रूग्ण व अवस्थेनुसार चिकित्सा बदलते. कोविडच्या या संकट काळात एक डॉक्टर सर्वदूर पोहोचू शकत नाही; पण औषध पोहोचू शकते. आयुर्वेदीय तत्वे वापरून असे औषध बनवणे अवघड होते. गुरुवर्य वैद्य समीर जमदग्नी यांच्या मार्गदर्शनामूळे हे शक्य झाले. कोविड रुग्णांना पहिल्या सहा-सात दिवसात (व्हायरस वर्धनाचा काळ) उकळून निम्मे केलेले पाणी (पाण्याचा काढा), सुंठ-तूप-गूळ गोळी व आयुर्वेदात व्हायरल तापांसाठी सांगितलेले सप्त मुष्टिक युष (हुलगे, वाळलेला मुळा, सुंठ, धने, बार्ली घातलेले मुगाचे कढण) हे आहारातून देणे शक्य आहे.”
या काळात रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी अंडी, मांस वगैरे प्रथिनयुक्त आहार दिला जात आहे. पण केवळ प्रथिनांच्या पलीकडे जात विशिष्ट धातूंसाठी विशिष्ट आहार-औषध हा आयुर्वेदात विचार आला आहे. या काळात काळ्या मनुका, खजूर, वेलची, दालचिनी, तूप, मध असे एकत्र करून खाल्ल्यास फुफ्फुसे, रक्त व इम्युनिटीसाठी बलकारक ठरते व ऑक्सिजन वाढण्यास मदत होते. तसेच पित्त वा उष्ण प्रकृतीचे रुग्ण सोडून बाकी रुग्णांना लसूण पाकळ्या उकळलेले दूध फुफ्फुसासाठी अत्यंत लाभदायक ठरते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या अशा आहारीय औषधांचा वापर करण्याविषयीचा आग्रह केंद्रीय आयुष विभागाकडे धरला असल्याचेही त्यांनी सांगितले.