ज्येष्ठ संपादक व विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते होणार प्रदान
अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा राज्य पातळीवरील भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार सुप्रसिध्द ज्येष्ठ काँग्रेस नेते, साहित्य, संगीत, नाटक, संत साहित्य व ललित कला याचे जाणते अभ्यासक, उत्तम रसिक, प्रसिद्ध वक्ते, सुसंस्कृत राजकारणी व रसिकाग्रणी उल्हासदादा पवार, पुणे यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, यशवंतराव चव्हाण यांची शिल्प प्रतिमा, सन्मानपत्र, रोख २५ हजार रुपये, शाल, पुष्पगुच्छ असे आहे. चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक, नाट्यकर्मी व थोर विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१ रोजी अंबाजोगाई येथे प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.
उल्हासदादा पवार हे अगदी तरुण पणात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बनले. त्यांनी पुणे शहर, जिल्हा व नंतर महाराष्ट्र पातळीवर युवक काँग्रेसचे अनेक पदे भूषविली. आज तागायत ते काँग्रेस पक्षाचे काम करतात. राजकारणात राहून त्यांनी साहित्य, संगीत, नाटक, लोककला, ललितकला यात आपली अभ्यासपूर्ण रसिकता सिद्ध केली आहे. वाचन व विविध विषयांवर शेकडो व्याख्याने त्यांनी दिली आहेत.त्यांनी तरुणपणी अनेक नाटकात अभिनय केला आहे. संतसाहित्य व गांधीविचार हा त्यांचा आवडीचा विषय आहे. ज्ञानेश्वरी ला ७०० वर्षे झाली त्यासाली त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने दिली. गांधी शताब्दी निमित्त ही त्यांनी व्याखाने दिली आहेत. भांडारकर इन्स्टिट्यूट, भारत इतिहास संशोधन मंडळ, भारत नाट्य संशोधन मंदिर, महाराष्ट्र साहित्य परिषद, विठ्ठल रुख्मिनी मंदिर पंढरपूर, आळंदी विकास मंडळ यांचे ते विश्वस्त राहिले आहेत. पश्चिम महाराष्ट्र व उर्वरित महाराष्ट्र या दोन्ही विकास मंडळाचे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. १२ वर्षे ते विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य होते. गांधींनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघाचे ते मुख्य पदाधिकारी राहिले आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही तत्वज्ञान, धर्म व विज्ञान आणि शांती व बंधुभाव यावर मोठे कार्य केले आहे.
आळंदी येथे पार पडलेल्या ६९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन त्यांनी केले होते. अनेक साहित्य, काव्य व संगीत मैफलीत त्यांची उपस्थिती प्रेरक व चैतन्यदायी असते. त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन गदिमा जीवन पुरस्कार-माडगूळ, संत जगद्गुरू तुकाराम महाराज पुरस्कार-जुन्नर, महर्षी पुरस्कार-पुणे, यशवंत-वेणू पुरस्कार- चिंचवड, डॉ. निमलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार, पुणे अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उत्तम संसदपटू पुरस्कारही त्यांना राष्ट्पतीच्या हस्ते देण्यात आला आहे. शेतीकरी व वारकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. निष्कलंक राजकीय व सामाजिक जीवन आजतागायत ते जगले आहेत. त्यांचे व भगवानराव लोमटे यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.
हा पुरस्कार यावर्षी अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात ३० सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. कोविड १९ च्या नियमांचे पालन केले जाणार असून, तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे दगडू लोमटे, डॉ. कमलाकर कांबळे, प्रा. सुधीर वैद्य, सतीश लोमटे, भगवानराव शिंदे बप्पा, प्रा. प्रकाश प्रयाग, प्रा. शर्मिष्ठा लोमटे व प्रा. भगवान शिंदे व राजपाल लोमटे यांनी केले आहे.