पुणे : भारताचे पहिले सेनादल प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत व इतर ११ सेनादलातील अधिकाऱ्यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत नुकतेच निधन झाले. सूर्यदत्ता नॅशनल स्कुल, सूर्यदत्ता पब्लिक स्कुल, सूर्यदत्ता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम झाला.
सूर्यदत्ता नॅशनल स्कुलच्या संचालक शैला ओक म्हणाल्या, जनरल रावत हे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. त्यांच्या मुत्सद्दी आणि धोरणात्मक कामगिरीमुळे ते सैन्यासह सामान्य जनतेतही प्रिय होते. भारतीय सैन्याचा मोठा वारसा रावत यांच्या कुटुंबाला आहे. १६ डिसेंबर १९७८ रोजी त्यांनी ११ गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमधून रावत सैन्यात दाखल झाले होते. राष्ट्रहितासाठी त्यांनी दूरदृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यांचे शौर्य, धाडस, हुशारी, चाणाक्ष बुद्धी आणि जोखीम पत्करण्याची क्षमता सर्वांसाठी प्रेरक होती. त्यांचे जगणे आणि मरणे हे केवळ लष्करी होते. जनरल रावत यांचे असे अकाली आणि दुर्दैवी जाणे सैन्य दलासह राष्ट्राचे अपरिमित नुकसान करणारे आहे. त्यांना जीवनात मोलाची साथ देणारी त्यांची पत्नी मधुलिका यांचे जाणे मनाला चटका लावणारे आहे.
या दुर्घटनेवेळी सैन्याबरोबर घटनास्थळी बचाव कार्य करणाऱ्या स्थानिक लोकांचे धाडसही कौतुकास्पद आहे. निलगिरी येथील लोकांनी कोणीही न सांगता किंवा न मागता निस्वार्थ भावनेने दाखवलेले हे औदार्य कायम लक्षात राहील. त्यांच्या अंगावर कोणतेही वर्दी नव्हती, मात्र त्यांच्यातील धाडस, शौर्य सर्वांनाच अचंबित करणारे होते. सविता डाके यांनी जनरल रावत यांच्या आयुष्यातील काही घटना, प्रेरणादायी प्रसंग आणि किस्से याबाबत उपस्थितांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतांमधून सैन्य दलातील जवानांविषयीच्या भावना व्यक्त केल्या.