देशातील पहिले सायबर विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करणार : ‘सुर्यदत्ता’मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन

देशातील पहिले सायबर विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करणार : ‘सुर्यदत्ता’मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन

‘मंत्र्यांसोबत संवाद’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; डॉ. एपीजे अब्दुल कलाम सभागृहाचे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
 
पुणे : “तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सायबर सुरक्षेची आवश्यकता लक्षात घेता त्याविषयीचे प्रगत शिक्षण उपलब्ध होणे महत्वाचे आहे. देशातील पहिले सायबर विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. राज्यातील पहिले संतपीठ माझ्या कारकिर्दीत उभारता आल्याचे समाधान आहे, असे ते म्हणाले.
 
सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ‘मंत्र्यांसोबत संवाद’ कार्यक्रमांतर्गत ‘ऑनलाइन व एकत्रित शिक्षणाच्या संदर्भात सायबर सुरक्षा’ या विषयावर विद्यार्थी, प्राध्यापक आणि निमंत्रित पालकांशी संवाद साधताना उदय सामंत बोलत होते. सुर्यदत्ताच्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, स्नेहल नवलखा, डॉ. किमया गांधी, राजकुमार सुराणा, किरण साळी, निलेश गिरमे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. एपीजे अब्दुल कलाम सभागृहाचे उद्घाटन झाले. महाविद्यालयातील विद्यार्थी व सोनाली ससार यांनी कोकणी नृत्य सादर केले. सामंत यांच्या हस्ते ‘कोकण व्हिजन २०२५’ डॉक्युमेंटचे प्रकाशन झाले. तसेच दृक्श्राव्य सादरीकरण झाले. त्यासाठी सुखविंदर कौर व अमोल गुप्ते यांनी मेहनत घेतली. 
 
उदय सामंत म्हणाले, “कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण नावारूपाला आले असले, तरी ऑफलाईन शिक्षणाला विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. गेल्या १९ महिन्यात अनेकांची मानसिकता बदलली आहे. ऑफलाईन शिक्षण आणि ऑनलाईन परीक्षा असा विचार विद्यार्थी करतात. पण आपल्याला सर्वसमावेश, दर्जेदार शिक्षण घ्यायचे आहे. त्यामुळे ऑफलाईन शिक्षणावर भर द्यायला हवा. येत्या काळातही महाविद्यालये आणि शाळा विद्यार्थ्यांनी गजबजून जावीत, यासाठी लसीकरण, कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.”
 
“डॉ. अब्दुल कलाम यांचे कार्य आदर्शवत होते. त्यांच्या नावाने उभारलेल्या सभागृहाचे उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे, याचा आनंद वाटतो. ‘सूर्यदत्ता’मधील विद्यार्थी, शिक्षकांनी डॉ. कलाम यांचा आदर्श घेत भावी पिढीला घडवावे. पायाभूत सुविधांच्या विकासासोबत युवापिढीच्या संस्कारांचाही विकास महत्वाचा असल्याचे डॉ. कलाम सांगत. त्यानुसार चांगल्या शैक्षणिक सुविधा सर्वांपर्यंत पोहोचल्या, तर राज्य शैक्षणिकदृष्ट्या सदृढ होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन या विभागाचा मंत्री झाल्यापासून अनेक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, शिक्षण तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आणत आहोत,” असेही उदय सामंत यांनी नमूद केले.
 
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सर्वसमावेशक आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सुर्यदत्ता कटिबद्ध आहे. कोरोना संकटानंतर महाविद्यालये चालू होताना शैक्षणिक व सामाजिक संस्था म्हणून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. याची सुरुवात शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होत आहे. त्यांच्या हस्ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम सभागृहाचे उद्घाटन झाले. तसेच अनेक योजनांची सुरुवात झाली. वीर विधवांच्या मुलांना, कोकणातील पूरग्रस्त गरजू मुलांना, कोविडमुळे जीव गमावलेल्या कुटुंबातील मुलांना, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांना (ब्ल्यू कॉलर कामगार), तसेच मुळशी तालुक्यातील गरजू मुलांना मदत त्यांच्या हस्ते देऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करत आहोत.”
 
‘एनआयपीएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी (इंडस्ट्री-एम्प्लॉयी स्पॉन्सरशिप), वेटरन्स इंडियाचे अध्यक्ष भोलानाथ सिंह (वीर विधवांच्या मुलांना मदत), लायन्स क्लबच्या सीमा दाबके (कोविडमुळे जीव गमावलेल्या कुटुंबातील मुलांना मदत), सरपंच अमित तोडकर (रुरल डेव्हलपमेंट स्कीम), लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी (पूरग्रस्त मुलांना मदत) यांच्याकडे विविध योजनेची कागदपत्रे मंत्री महोदयांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली. ‘सूर्यदत्ता’चे प्रशांत पितालिया व वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. अक्षित कुशल, रोशनी जैन, मिलीना राजे, अमोल चिदंबर, नितीन कामठेकर, रोहन जमदाडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *