प्रमोद कुमार सिंह यांच्याकडून समितीच्या अन्नसेवा उपक्रमाचे कौतुक
पुणे : “ग्रामीण भागातील युवकांच्या परिवर्तनासाठी काम करत असलेल्या विद्यार्थी सहायक समितीचे कार्य राष्ट्र उभारणीत योगदान देणारे आहे. सकारात्मक आणि निःस्वार्थ भावनेतून होत असलेले काम पाहून प्रभावित झालो. समितीच्या कार्याशी भविष्यात मलाही जोडून घ्यायला आवडेल,” अशा शब्दात खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार सिंह यांनी विद्यार्थी सहायक समितीच्या कार्याचे कौतुक केले.
विद्यार्थी सहायक समितीने अक्षयपात्र संस्थेच्या माध्यमातून सुरु केलेल्या अन्नसेवा उपक्रमाच्या निमित्ताने प्रमोद कुमार सिंह यांनी समितीला सदिच्छा भेट दिली. यावेळी कल्याणी टेक्नो फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक रवी नगरकर, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त संजय अमृते, तुषार रंजनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, माजी विद्यार्थी सोपान गोंटला, जीवराज चोले, पर्यवेक्षक कुंदन पाठारे आदी उपस्थित होते.
प्रमोद कुमार सिंह यांनी समितीची ध्वनिचित्रफीत पहिली. तसेच अन्नसेवा उपक्रम व आशीर्वाद वृक्ष योजनेची आस्थेने चौकशी करत कौतुक केले. अक्षयपात्रचे कामकाज पाहिले. वृक्ष लागवड योजनेत, तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात सहभागी होण्याचे आश्वासन दिले.
प्रमोद कुमार सिंह म्हणाले, “अन्नसेवा उपक्रमाच्या निमित्ताने सोपान गोंटला यांच्याकडून समितीविषयी खूप ऐकले होते. आज प्रत्यक्ष भेट समिती समजून घेता आली. समितीच्या विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडून अनेक गोष्टी करता येतील. तसेच झाडे लावण्याचा माझा छंद असल्याने त्यामध्ये रोपे देण्यासह अन्य बाबतीत मला समितीसोबत काम करायला आवडेल.”
रवी नगरकर म्हणाले, “कमीतकमी संसाधनात जास्तीतजास्त प्रभावी काम करण्याचे संस्कार समितीने दिले. नेतृत्व विकसित करण्यासह समाजभानही दिले. समाजाला मदत करण्यासाठी समिती कायमच पुढे असते. या संस्थेचा एक घटक असल्याचा अभिमान वाटतो. डॉक्टर, नर्सेस आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रोजचे भोजन समितीकडून पुरवले जात आहे, याचा आनंद वाटतो.”
तुकाराम गायकवाड व अन्य सहकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत करत समितीच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.