विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे रंगले श्रीधर फडके यांचे भावपूर्ण सादरीकरण; रसिकांची उत्स्फूर्त दाद
पुणे : प्रत्येक देशवासियाच्या मनामनांत रुजलेल्या रामकथेला अजरामर शब्दसुरांत गुंफणाऱ्या ‘गीतरामायणा’चा पुन:प्रत्यय रसिकांनी शुक्रवारी सायंकाळी येथे घेतला. ‘सात स्वरांच्या स्वर्गामधुनी, नऊ रसांच्या नऊ स्वरधुनी’ जणु अवतरल्याचा अनुभव रसिकांनी घेतला. ‘पुत्र सांगती चरित पित्याचे…’ या गदिमांच्या शब्दांची अनुभूती प्रख्यात गायक श्रीधर फडके यांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांना दिली.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने ग. दि. माडगूळकर रचित, संगीतकार सुधीर फडके यांच्या गीतरामायणाचे सादरीकरण श्रीधर फडके यांनी केले. टिळक स्मारक मंदिर येथे हाऊसफुल्ल गर्दीत हा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर यांच्यासह समितीचे सर्व विश्वस्त, कार्यकर्ते, देणगीदार, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुप्रिया केळवकर यांनी स्वागत प्रास्ताविकात समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.
स्वये श्रीराम प्रभू ऐकती, दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला गं सखे, सावळा गं रामचंद्र, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, चरण तुझे पाहिले आज मी शापमुक्त झाले, स्वयंवर झाले सीतेचे, जय गंगे जय भागीरथी, शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम, माता न तू वैरिणी, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, सेतू बांधा रे सागरी, प्रभो मज एकच वर द्यावा, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, गा बाळांनो श्रीरामायण अशी गीते श्रीधर फडके यांनी सादर केली. सुकन्या जोशी, अभिजीत मोडक यांचे ओघवते निवेदन, तर तुषार आंग्रे (तबला), ओंकार पाटणकर आणि प्रणव कुलकर्णी (की बोर्ड), उद्धव कुंभार (तालवाद्ये) रश्मी भंडारी, गौरी सनगळ, योगेश पीतांबरे (समूहस्वर) यांची पूरक साथसंगत लाभली.
रामकथा गीतांच्या माध्यमातून उलगडताना श्रीधर फडके यांनी गीतरामायणाशी संबंधित अनेक आठवणी सांगितल्या. ‘१९५५ साली पुणे आकाशवाणीवरून गीतरामायण प्रथम सादर झाले. तेव्हा तत्कालीन अनेक प्रसिद्ध गायक कलाकार त्यात सहभागी झाले होते. गजाननराव वाटवे, मालती पांडे, माणिक वर्मा, ललिता फडके, लता मंगेशकर… अशी अनेक नावे त्यात होती. कवी ग. दि. माडगूळकर आणि संगीतकार गायक सुधीर फडके हे अद्वैत होते. दोघांनाही चित्रपट सृष्टीचा अनुभव असल्याने जे भाव गीतांत तेच भाव संगीत व गायनात दिसले. गीताच्या प्रत्येक कडव्यात वेगळे चित्र गदिमांनी मांडले. गीतातील शब्दांना नेमक्या भावाचे कोंदण बाबूजींनी स्वरांतून दिले. अभिजात भारतीय संगीतातील रागांचा वापर केला आणि ‘अवघ्या आशा श्रीरामार्पण’ या भावनेने ते सदैव वावरले,’ असेही श्रीधर फडके म्हणाले.
प्रतापराव पवार म्हणाले, “ग्रामीण भागातून पुण्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मुलामुलींना विद्यार्थी साहाय्यक समितीचा मोठा आधार आहे. आज समितीमध्ये पाच वसतीगृहात 1100 विद्यार्थी निवास भोजन व व्यक्तिमत्त्व विकासाची सुविधा घेत आहेत. समितीचा कार्य विस्तार होत असून, अहिल्यानगर येथे एक मुलींचे व एक मुलांचे वसतिगृह सुरू झाले आहे. या सर्व कार्यात समितीचे देणगीदार, हितचिंतक यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने दरवर्षी सांगीतिक कार्यक्रम आयोजिला जातो”.