उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांच्या भेटीनंतर मोठा निर्णय; पत्रकार, संघटना, माजी विद्यार्थ्यांच्या मागणीला यश
पुणे : गेल्या आठवड्याभरापासून पत्रकारितेच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या अर्थात संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या स्थलांतराचा वाद चांगलाच पेटला होता. आजी-माजी विद्यार्थी, पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि विविध राजकीय विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. याची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रानडे इन्स्टिट्यूटला भेट दिली. या भेटीवेळी पत्रकार, माजी विद्यार्थी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सामंत यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर विद्यापीठाच्या वतीने रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा निर्णय रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक जरी करण्यात आले. स्थलांतराला विरोध दर्शवणाऱ्या पत्रकार, माजी विद्यार्थ्यांनी या निर्णयानंतर आनंद व्यक्त केला.
रानडे इन्स्टिटयूटच्या स्थलांतराला आजी माजी विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. तसेच पुणे श्रमिक पत्रकार संघानंही विरोधाची भूमिका घेतली होती. उदय सामंत यांनी या सर्वांच्या विरोधाची भूमिका समजून घेतली आणि विद्यापीठाला विश्वासात घेत हा निर्णय रद्द करण्याची घोषणा केली. उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाला रानडे इन्स्टिट्यूटला भेट दिली. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, प्रकाश भोईटे यांच्यासह अन्य पदाधिकारी, पत्रकार आणि माजी विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रानडे इन्स्टिट्यूटमध्ये आता शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि परिसर सुधारणा होणे गरजेचे आहे, अशी विनंती राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर आणि इतर पत्रकारांनी केली आहे. यावर लवकरच विचार विमर्श करून योग्य ती पावले उचलली जातील व रानडे इन्स्टिट्यूटच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या गोष्टी येथे केल्या जातील, असे आश्वासन उदय सामंत यांनी यावेळी दिले.