‘स्माईल ए व्हाईल डेंटल केअर’तर्फे डेंटल असिस्टंट प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : “दाताच्या दवाखान्यात डॉक्टरांच्या हाताखाली कुशल सहायक असेल, तर दंतवैद्यकांना मोठी मदत होते. रुग्णांना हाताळण्यासाठी अशा कुशल सहाय्यकांची दंतवैद्यक क्षेत्राला गरज असून, स्माईल ए व्हाईल डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटर आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सुरु केलेला औपचारिक कौशल्यविकास अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल,” असे प्रतिपादन इंडियन डेंटल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन बर्वे यांनी केले.
दंतवैद्यक डॉ. नेहा दाते संचालित स्माईल ए व्हाईल डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटरतर्फे पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ‘डेंटल असिस्टंट प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. शनिवार पेठ येथील क्लिनिकमध्ये झालेल्या या सोहळ्याप्रसंगी हुजूरपागा हायस्कूलच्या माजी प्राचार्या अलका काकतकर, आर्किटेक्ट व मालमत्ता मूल्यकर्ता अर्चना दाते आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. नेहा दाते म्हणाल्या, “इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकॉल, पेशंटशी बोलण्याची पद्धत, शिष्टाचार, राहणीमान, डेंटल मटेरियल व साहित्य हाताळणी, निर्जंतुकीकरण अशा सगळ्या गोष्टी या पाठ्यक्रमात समाविष्ट केल्या आहेत. गेल्या दोन वर्षात आठ बॅचेसमधून ६१ मुली आणि महिलांना रोजगार देता आल्याचे समाधान आहे. १० वी उत्तीर्ण मुली-महिला आज १२ हजार पगार मिळवत असून, कुटुंबाला हातभार लावत आहेत. या अभ्यासक्रमामुळे समाजातील अनेक गरजू मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. गरजू महिलांना यार्दी वस्ती प्रकल्पातून अर्थसहाय्य पुरवले जाणार आहे.”
गाडगीळ यांच्या ‘ट्रेन डेन्ट’चे लोकार्पण
दंतवैद्यकांना सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना मार्गदर्शक असे ‘ट्रेन डेन्ट’ ऍप विकसित करण्यात आले आहे. ऍपच्या मदतीने त्यांच्या ज्ञानात आणि कार्यक्षमतेत भर पडणार आहे. प्रसिद्ध निवेदक, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते या ऍपचे लोकार्पण करण्यात आले. ज्येष्ठ ऑर्थोडोंटिक्स डॉ. जयेश रहाळकर, ज्येष्ठ फॅमिली फिजिशियन डॉ. धनंजय शिरोळकर, केदार आठवले हे उपस्थित होते.