लतादीदींच्या आठवणींनी उजळली तिन्हीसांज

लतादीदींच्या आठवणींनी उजळली तिन्हीसांज

‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवशी ‘लतादीदी एक स्मरणयात्रा’

पुणे : संगीतातील कुलदैवत मानल्या जाणाऱ्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाण्यांच्या सुवर्ण कालखंडाला उजाळा देत त्या मंतरलेल्या दिवसांची धुंद सैर आज पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १२ व्या ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचे उद्घाटन शिवरायांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून करण्यात आले. यावेळी भाजपचे खासदार प्रकाश जावेकर, भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, मुरलीधर मोहोळ, लोकमान्य मलटिपर्पज लि.चे हर्षल झोडगे, आयडियल कॉलनी ग्राउंडचे अध्यक्ष नंदकुमार वढावकर, प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, संगीतकार गायक डॉ. सलील कुलकर्णी आदी मंचावर उपस्थित होते.

प्रकाश जावडेकर म्हणाले, “पुणेकरांना अतिशय चांगली मेजवानी देणारा हा महोत्सव आहे. संगीत माणसाला कधीही एकटे पडू देत नाही. ते शेवटपर्यंत आनंद देत राहते. त्यात लता मंगेशकर यांचा आवाज असेल, तर मग वेगळीच पर्वणी म्हणावी लागेल. त्यांचा आवाज, गाणी ही दैवी अनुभूती असते.” चित्रा वाघ म्हणाल्या, “हा महोत्सव फक्त कोथरूडचा राहिला नसून, तो आता पुण्याचा महोत्सव झाला आहे.”

लतादीदींच्या आठवणींना उजाळा देत ‘लतादीदी एक स्मरणयात्रा’ या कार्यक्रमाद्वारे सुरांजलीचा पूर्वार्ध अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. सलील कुलकर्णी यांनी लता मंगेशकर यांच्या पहिल्या गाण्यापासून ते तीन दशकांपर्यंतचा सुरेल प्रवास उलगडला. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, गायिका विभावरी आपटे-जोशी, प्राजक्ता जोशी-रानडे, शरयू दाते, गायक अनिरुध्द जोशी, प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक यांच्या सुरांनी हा सुवर्णकाळ उजळला.

मोगरा फुलला, चाफा बोले ना, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा, कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला, जन पळ भर म्हणतील हाय हाय, कशी जाऊ पुढे मागे, सखी ग वैरीण झाली नदी, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, ये जवळी ये प्रिय सखया भगवंता… अशा एका पेक्षा एक भारावलेल्या गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. लतादीदींनी स्वरबध्द केलेल्या संत ज्ञानेश्वर, वसंत प्रभू, भा. रा. तांबे यांच्या अशा अद्भूत रचना यावेळी सादर झाल्या. मराठी, हिंदी गाण्यांनी वातावरण भारावले.

यावेळी दर्शना जोग, सागर साठे (की-बोर्ड), रितेश ओहोळ (गिटार), आदित्य आठल्ये (तबला), डॉ. राजेंद्र दूरकर (ढोलकी, पखवाज), अभिजित भदे (वेस्टर्न रिदम) यांनी साथसंगत केली. निलेश यादव यांनी ध्वनी संयोजन केले.

या कार्यक्रमासाठी पुनीत बालन ग्रुप, बढेकर ग्रुप, गोखले कंस्ट्रक्शन्स, रावेतकर बिल्डर्स, रांजेकर बिल्डर्स, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि., बुलढाणा अर्बन बँक लि., सुहाना मसाले, पी.एन.जी. ज्वेलर्स यांचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.