शरद गोसावी यांचे स्पष्टीकरण; सोशल मीडियातील कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला
रोटरी क्लब ऑफ युवा व ‘सुपरमाईंड’ फाउंडेशनतर्फे दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन सत्र
पुणे : “अभ्यासातील प्रामाणिकता, संकल्पना समजून घेत केलेला नियमित सराव हाच दहावीच्या परीक्षेतील यशाचा ‘सक्सेस मंत्रा’ आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून आत्मविश्वासाने परीक्षेचे तंत्र समजावून घेत संकल्पनाधारित अभ्यास केला, तर ही परीक्षा सहज सोपी आहे,” असा सल्ला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिला. यंदा विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरसाठी अर्धा तास अधिकचा वेळ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी रोटरी क्लब ऑफ युवा व सुपरमाईंड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सक्सेस मंत्रा’ या विनामूल्य ऑनलाईन मार्गदर्शन सत्राच्या उद्घाटनावेळी महाराष्ट्र राज्य मंडळ, एसएससी बोर्डाचे अध्यक्ष श्री. शरद गोसावी बोलत होते. प्रसंगी ‘रोटरी’चे शिरीष पुराणिक, क्रांती शहा, गौरी शिकारपूर, आशा आमोणकर, दीपा भागवत, रोटरी युवाच्या अध्यक्षा तृप्ती नानल, श्रीकांत जोशी, दीपा बडवे सुपरमाईंडच्या संचालिका अर्चिता मडके आदी उपस्थित होते.
या मार्गदर्शन सत्रातील दुसरा टप्पा येत्या शनिवारी (दि. १५) दुपारी ४.०० वाजता होणार आहे. विज्ञान विषयाच्या तज्ज्ञ डॉ. सुलभा विधाते व भाषा विषयाच्या सुवर्णा कऱ्हाडकर मार्गदर्शन करणार आहेत. अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा. सहभागासाठी विनामूल्य नोंदणी https://bit.ly/3JKBnma या संकेतस्थळावर जाऊन करावी.
शरद गोसावी म्हणाले, “परीक्षेत किती गुण मिळाले, यापेक्षा आपल्याला ज्ञान किती मिळाले, हे अधिक महत्वाचे आहे. विद्यार्थी-पालकांनी पाठांतरावर भर न देता संकल्पना समजावून घेतल्या पाहिजेत. परीक्षेचे बदलते स्वरूप, अभ्यासक्रमातील बदल समजून घ्यावेत. दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा आमचा विचार आहे. त्यामुळे सोशल मीडियातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहिती शाळेकडून किंवा बोर्डाकडून वेळोवेळी देण्यात येईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होईल, त्यामुळे प्रतिकारक्षमता आणि आत्मविश्वास दोन्ही वाढणार असून, विद्यार्थ्यांना यंदा परीक्षा सोपी जाईल.”
जयश्री अत्रे म्हणाल्या, “पुस्तकातील गणितीय संकल्पना, गणिते व्यवस्थित अभ्यासली आणि गणितातील ट्रिक्स समजून घेतल्या, तर गणिताचा पेपर सोपा जातो. सातत्याने गणिताचा सराव आपल्याला यश मिळवून देतो. उरलेल्या ७० दिवसांत गणितासह सर्वच विषयांचा सराव विद्यार्थ्यांनी करावा.” अर्चिता मडके यांनी सूत्रसंचालन केले. तृप्ती नानल यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. दीपा बडवे यांनी आभार मानले.