८८ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पं. हृदयनाथ मंगेशकरांनी दिला आठवणींना उजाळा
मनीषा निश्चल्स महक कॉन्सर्टतर्फे आयोजन; लतादीदींनी स्वरबद्ध केलेल्या गाणी, भजनाचे सादरीकरण
पुणे: “लतादीदी मला बहीण म्हणून लाभल्या आणि माझे जीवन समृध्द झाले. त्यांच्या सहवासाने माझे जीवन घडत गेले. लतादीदी गेली तेव्हा, ‘अवचिता परीमळू झुळुकला अळूमाळू’ अशी माझी अवस्था झाली होती. परंतु लतादीदीचे अस्तित्व आजही आहे. तिने सांगितलेल्या मार्गाने माझी वाटचाल असल्याने ती कायम माझ्यासोबतच आहे, याची जाणीव मला होते. लतादीदींचा सहवास मला भारावून टाकणारा आहे,” अशी भावना ज्येष्ठ संगीतकार, भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केल्या.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त मनीषा निश्चल्स महक कॉन्सर्टतर्फे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘असे होते दिवस’ या संगीत मैफिलीचे आयोजन केले होते. यावेळी भावगंधर्वांनी लतादीदींसोबतच्या आठवणींना पुणेकरांसमवेत उजाळा दिला. त्याला अनुसरून गायकांनी लतादीदींच्या गाण्यांचे सादरीकरण केले.
गुणी बाळ असा, रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, अजी रुठकर कहाँ जाईएगा, यारा सीलि सीलि, जरा सी आहट होती है, तो दिल ये सोचता है, कही ये वो तो नही, रात भी है कुछ भीगी भीगी, निज रे गोपाळा, आजा रे परदेसी, अशी लतादीदींची क्लासिक गाणी तसेच पपीहा रे पपीहा रे, माई माई, चलाँ वाहि देस अश्या मीराबाईंच्या भजनांच्या सुरावटींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गायिका मनीषा निश्चल, विभावरी आपटे-जोशी यांनी गायन केले. त्यांना वाद्यांवर राजेंद्र दूरकर व विशाल गंड्रतवार (तबला), विवेक परांजपे व दर्शना जोग (सिंथेसायझर), अभय इंगळे (ऑक्टोपॅड) यांनी साथसंगत केली.
पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, “दीदीच्या दोन बाजू होत्या. एक तिचा साधेपणा आणि दुसरी तिला सर्वत्र मिळणारा सन्मान. लतादीदी एकमेव गायिका आहे, जिच्या निधनानंतर ३९ देशांनी आपले ध्वज उतरवले होते. ही आपल्या सर्वांसाठीच आभिमानाची गोष्ट आहे. लतादीदी भारताचाच नाही, तर संपूर्ण विश्वाचा सन्मान होता. दीदी खूप मोठ्या शिवभक्त होत्या. छत्रपतींच्या गाण्यावर ध्वनिमुद्रिका बनवण्याचा निर्णय घेतला. त्या अतिशय स्वाभिमानी आणि मनस्वी होत्या.”