पुणे: हिंदुत्वाचा स्वाभिमान अन मराठीचा बाणा जपणाऱ्या राज ठाकरे यांची काल कसबा मतदारसंघात खणखणीत सभा झाली. राज यांच्या सभेनंतर कसबा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांना जनतेतून पाठिंबा वाढत आहे. रविवारी सुट्टीचा योग साधत भोकरे यांनी मतदारसंघात घरोघरी जात भेटीगाठी घेण्यावर भर दिला. यावेळी नागरिकांनी भोकरे यांचे आपुलकीने स्वागत करीत यंदा मनसेच्या पाठीशी राहू, असा विश्वास दिला.
गणेश भोकरे यांच्या उमेदवारीने यंदा कसब्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या गलिच्छ राजकारणाला वैतागलेली जनता परिवर्तन करण्याच्या मूडमध्ये आहे. त्यातच राज ठाकरे यांची काल सभा झाल्याने येथील मनसे पदाधिकाऱ्यांमध्येही चैतन्य संचारले असून, कसब्याच्या चांगल्या भविष्यासाठी गणेश भोकरे यांच्यासारखा तरुण, तडफदार आणि इमानदार चेहरा आमदार म्हणून निवडून द्यायचा, असा मतप्रवाह जोर धरू लागला आहे.
मतदानाला केवळ आठ दिवस उरले असल्याने पेठांमध्ये भोकरे यांनी रविवारी पदयात्रेच्या माध्यमातून घरोघरी जात गाठीभेटी घेतल्या. ठिकठिकाणी भोकरे यांचे स्वागत, महिलांकडून औक्षण झाले. ज्येष्ठांना आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवला. मंडई, बाजीराव रस्ता, नवी पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, सेनादत्त पेठ, टिळक रोड, शास्त्री रोड परिसरात प्रचार केला. मनसेचे पदाधिकारी निलेश हांडे, रवी सहाणे, आशिष साबळे, आशुतोष माने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले.
गणेश भोकरे म्हणाले, “प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचत असताना राजसाहेबांनी घेतलेली सभा मला प्रोत्साहन देणारी आहे. कालच्या सभेला उदंड प्रतिसाद मिळाला. राजसाहेबांनी महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम करण्यासाठी मनसेला निवडून देण्याची साद मतदारांना घातली आहे. या निवडणुकीत निश्चितपणे कसब्यातून मनसेचा विजय होईल, असा विश्वास वाटतो. मतदारसंघातील सर्वच भागांतून मिळणारा प्रतिसाद, प्रेम मला विजयाकडे घेऊन जाणारे आहे.”