पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सहभाग, आठवणी व सुसंवाद; डॉ. राधा मंगेशकर, मनीषा निश्चल, जितेंद्र अभ्यंकर यांचे गायन
पुणे : सुवर्णकाळातील अजरामर गीतांच्या ‘स्वरस्वती’ या बहारदार सांगीतिक मैफिलीचे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लतादीदींच्या निधनानंतर पं. हृदयनाथ मंगेशकर प्रथमच मंचावर सहभागी होत आहेत. लतादीदींच्या आठवणी, मनमोकळ्या गप्पा व सुसंवाद या मैफलीत स्वतः पं.हृदयनाथ मंगेशकर हे सांगणार आहेत.
मनीषा निश्चल्स महक निर्मित व प्रस्तुत, गेट सेट गो आयोजित ‘स्वरस्वती’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम शुक्रवार, दि. १८ मार्च २०२२ रोजी रात्री ९.३० वाजता होणार आहे. कोरोनानंतर जीवनमान पुन्हा पूर्ववत होत असताना संपूर्ण कलाकारांच्या चमूसह होणारी ही पहिलीच मैफल आहे. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होत आहे.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सहभाग आणि सुसंवाद, लतादीदींच्या आठवणी हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असेल. गायिका डॉ. राधा मंगेशकर, मनीषा निश्चल आणि गायक जितेंद्र अभ्यंकर यांचे मंत्रमुग्ध करणारे गायन, अनय गाडगीळ, मिहीर भडकमकर, बाबा खान, केदार मोरे, प्रसाद गोंदकर, समीर सप्रे, विशाल थेलकर, निलेश देशपांडे अपूर्व द्रविड, ऋतुराज कोरे यांचे बहारदार वादन अनुभवायला मिळणार आहे.