टेकफेस्ट’सारखे उपक्रम महत्वपूर्ण: प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
पुणे: सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटच्या एमसीए व एमबीए विभागाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील टेकफेस्ट-२०२५चे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्या कल्याणासाठी तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित हा तीन दिवसीय राष्ट्रीय महोत्सव ‘सूर्यदत्त’च्या बन्सीरत्न सभागृहात नुकताच यशस्वीपणे पार पडला.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, डिजिटल स्ट्रॅटेजिक अडवायझर सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यकारी अधिकारी व समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, संचालक प्रा. डॉ. मनीषा कुंभार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, निमंत्रित अतिथी, सहभागी उत्साही विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
या महोत्सवामध्ये ‘मास्टर अँड मिस टेक्नोक्रॅट्स’, ‘माईंडस्वीपर’, ‘बॅटल विथ कोड’, ‘डिझाईन फायर’, ‘गेम ग्लायडर’, ‘सस्टेनप्रेन्युअर’, ‘बिझनेस लिंगो’, ‘लीग ऑफ लीडर्स’ व ‘मास्टर अँड मिस मॅनेजर’ अशा नऊ वैविध्यपूर्ण स्पर्धा घेण्यात आल्या. देशभरातील ४० इन्स्टिट्यूट्समधील ८०० पेक्षा अधिक विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. स्पर्धेतील नोंदणी ते निकाल जाहीर करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया विनासायास पार पाडण्यासाठी ‘ईआरपी’ प्रणाली वापरण्यात आली. उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पारितोषिके संस्थेतील व बाह्य स्पर्धकांसाठी स्वतंत्र गटांमध्ये विभागली गेली होती. संस्थेतील प्राध्यापक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
‘मास्टर अँड मिस टेक्नोक्रॅट्स’मध्ये तांत्रिक, तार्किक आणि सॉफ्ट स्किल्सचे मूल्यमापन, प्रश्नमंजुषा, गटचर्चा, समस्या सोडविण्याच्या फेऱ्या आणि उद्योग तज्ज्ञांमार्फत घेतल्या जाणाऱ्या मुलाखती असे स्वरूप होते. ‘माईंडस्वीपर’ स्पर्धेत वास्तविक समस्यांवर नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर उपाय तयार करण्यासह कोडिंग व अॅप्लिकेशन विकास कौशल्य दाखवायचे होते. ‘बॅटल विथ कोड’ ही एक प्रोग्रॅमिंग स्पर्धा होती. यामध्ये डिबगिंग, अल्गोरिदम ऑप्टिमायझेशन आणि स्पर्धात्मक कोडिंग करायचे होते. ‘डिझाईन फायर’ ही डिझाईन स्पर्धा होती. ज्यामध्ये युझर-फ्रेंडली वेब आणि मोबाईल ऍप्लिकेशन्स तयार करायची होती. गेमिंग स्पर्धा असलेल्या ‘गेम ग्लायडर’मध्ये स्पर्धकांना धोरणात्मक विचारशक्ती, संघभावना आणि त्वरित प्रतिक्रिया देण्याच्या क्षमतेची चाचणी द्यायची होती. ‘सस्टेनप्रेन्युअर’ ही उद्योजकतेवरील आधारित स्पर्धा होती, ज्यामध्ये स्पर्धकांना तंत्रज्ञान आणि नवोन्मेष याचा उपयोग करून सामाजिक परिणाम साधणाऱ्या शाश्वत व्यवसाय कल्पनांची मांडणी करायची होती. ‘बिझनेस लिंगो’मध्ये व्यावसायिक संवाद कौशल्य, कॉर्पोरेट शिष्टाचार, वाटाघाटी कौशल्ये आणि सादरीकरण दाखवायचे होते. ‘लीग ऑफ लीडर्स’ ही नेतृत्व क्षमता स्पर्धा होती, ज्यामध्ये निर्णयक्षमतेचे, धोरणात्मक नियोजनाचे आणि संघ व्यवस्थापन कौशल्यांचे मूल्यमापन सिम्युलेशन्स आणि केस स्टडीजच्या माध्यमातून करण्यात आले. व्यवस्थापन कौशल्य स्पर्धा असलेल्या ‘मास्टर अँड मिस मॅनेजर’मध्ये समस्या सोडविण्याची क्षमता, संकट व्यवस्थापन आणि नेतृत्व गुणधर्म याचे मूल्यमापन झाले, असे डॉ. मनीषा कुंभार यांनी नमूद केले.
“विश्लेषणात्मक आणि तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासह नवोन्मेष आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा महोत्सव उपयुक्त ठरला. शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रातील दरी कमी करण्यासाठी ‘टेकफेस्ट’सारखे शैक्षणिक उपक्रम महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये प्रोग्रामिंग आणि समस्या सोडवण्यासाठीची कौशल्ये विकसित होण्याला प्रोत्साहन मिळते. सखोल नियोजन आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला. यासह विद्यार्थ्यांनी टीमवर्क, सहकार्य भावना आणि प्रकल्प व्यवस्थापनाच्या क्षमता विकसित करण्याचे ज्ञान आत्मसात केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष संगणकीय आव्हानांवर केला, ज्यामुळे त्यांना मौल्यवान अनुभव आणि उद्योगाशी संबंधित परिस्थितींचा प्रत्यक्ष परिचय मिळाला. ‘सूर्यदत्त’मध्ये अशा प्रकारच्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया