पुणे: सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने बौद्धिक व शैक्षणिक देवाणघेवाणीसाठी कोरियातील काँगवून विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये काँगवून विद्यापीठाच्या टीमने नुकतीच भेट देऊन या सामंजस्य कराराचे आदानप्रदान केले. इलेक्ट्रिकल अँड बायोलॉजिकल फिजिक्सचे प्रा. नागेंद्र कुमार कौशिक व इंटरनॅशनल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संचालक सुंगवू बेंझामिन चो यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
मिस टिना चो, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, स्ट्रॅटेजिक डिजिटल ऍडवायझर सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते. या सामंजस्य कराराने काँगवून विद्यापीठ व सूर्यदत्त ग्रुप यांच्यातील शैक्षणिक आणि संशोधन उपक्रमांमध्ये सहकार्याला चालना मिळणार आहे. क्षमता निर्माण, विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधन सहकाऱ्यांचे आदानप्रदान, संयुक्त संशोधन प्रकल्प व परिषदांचे आयोजन आणि शैक्षणिक विकासासाठी योगदान देणाऱ्या इतर उपक्रमांचा समावेश यामध्ये असणार आहे.
दक्षिण कोरियातील सेऊलमध्ये असलेले काँगवून विद्यापीठ हे अभियांत्रिकीसह माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, सॉफ्टवेअर व कम्प्युटर इंजिनीअरिंग, आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग, आदी शाखांच्या शिक्षणासाठी एक नामांकित शिक्षणसंस्था आहे. वायरलेस कम्युनिकेशन आणिइलेक्ट्रॉनिक्स एज्युकेशनमध्ये अग्रणी काँगवून विद्यापीठात व्यवसाय, आंतरराष्ट्रीय व्यापार, गणित, रसायनशास्त्र, क्रीडा, कोरियन भाषा व संस्कृती, कायदा आणि औद्योगिक मानसशास्त्र आदी अभ्यासक्रम प्रदान केले जातात.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स बहुशाखीय कॅम्पस असून, प्राथमिक शिक्षणापासून शालेय, महाविद्यालयीन, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी ते पीएचडीपर्यंतचे सर्वसमावेशक शिक्षण इथे दिले जाते. नामवंत विद्यापीठांशी संलग्नित ‘सूर्यदत्त’मध्ये बिझनेस मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉमर्स, ट्रॅव्हल टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कम्प्युटर अप्लिकेशन, इंटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, इव्हेन्ट मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन, एज्युकेशन, अनिमेशन, लॉ, सायबर सिक्युरिटी, फिजियोथेरपी, फार्मसी, नर्सिंग, फिल्म मेकिंग, ब्युटी अँड वेलनेस, हेल्थ अँड फिटनेस, परफॉर्मिंग आर्टस् आदी शाखांमधील विविध अभ्यासक्रम शिकवले जातात याची माहिती विद्यापीठ प्रतिनिधींना देण्यात आली . दोन्ही संस्थांमधील उपलब्ध संधी तसेच भारतीय संस्कृती आणि परंपरांवर आधारित अभ्यासक्रम कोरियन विद्यार्थ्यांना भारतात , महाराष्ट्रातील पुणे येथे उपलब्ध करून देण्याबद्दल तसेच ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबतही विस्तृत चर्चा करण्यात आली . याप्रसंगी सूर्यदत्त संस्थेच्या वतीने संचालक , प्राचार्य , विभागप्रमुख तसेच वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले .
दक्षिण कोरियामध्ये नुकत्याच झालेल्या शिक्षण परिषदेमध्ये ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा सहभागी झाल्या होत्या. यावेळी नवलखा यांनी कोरियातील प्रगत तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण इनोव्हेशन्स, शिक्षण प्रणाली जाणून घेत कोरियातील प्रमुख विद्यापीठांशी सहकार्य करार करण्याची संधी शोधली. विविध विषयांवर चर्चा करून सूर्यदत्त व कोरियातील विद्यापीठांशी भागीदारी कशी वाढवता येईल, याचा त्यांनी आढावा घेतला. त्याचाच भाग म्हणून हा सामंजस्य करार एक मैलाचा टप्पा आहे, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.