Post Views: 34
पुणे: इंटरनॅशनल कुराश असोसिएशनच्या वतीने मंगोलिया येथे घेण्यात आलेल्या जागतिक कुराश चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्यातील डॉ. संतोष तेली यांनी पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकविले. त्यानिमित्त कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रातर्फे डॉ. संतोष तेली यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या हस्ते डॉ. तेली यांना शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र व सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंखे, खजिनदार सोनाली नागर, डॉ. नंदिनी तेली, करणसिंह मोहिते आदी उपस्थित होते.
व्यवसायाने अस्थिरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. तेली यांनी वरिष्ठ, ६५ किलो वजनी गटात ही चमकदार कामगिरी केली. विविध फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट खेळ करीत अंतिम फेरी गाठल्यानंतर डॉ. तेली यांनी राजस्थान येथील धर्मेंद्र कुमार या भारतीय खेळाडूला मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्वचारोग व कॉस्मेटोलॉजी तज्ज्ञ डॉ. नंदिनी तेली यांनी त्यांच्या डायट व तंदुरुस्तीची देखभाल केली. या स्पर्धेत एकूण ३४ देश सहभागी झाले होते. कनिष्ठ (१७ वर्षाखालील), कॅडेट (१८ वर्षांवरील) व वरिष्ठ (४० वर्षावरील) अशा तीन गटात ही स्पर्धा झाली.
डॉ. संतोष तेली म्हणाले, “जागतिक स्तरावरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यात सुवर्णपदक जिंकून येणे ही अभिमानाची गोष्ट आहे. कुराश हा खेळ कौशल्याने खेळण्याचा असून, त्यासाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. या प्रवासात कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. माझी पत्नी डॉ. नंदिनी यांनी माझे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सक्षम राहावे, यासाठी खूप मेहनत घेतली. यापुढील काळातही भारतासाठी अनेक पदके जिंकण्यासाठी माझा प्रयत्न राहील.”
काका पवार यांनी डॉ. संतोष तेली यांच्या कामगिरीचे कौतुक केले. भारतीय खेळाडूंनी जागतिक स्पर्धांमध्ये चांगला खेळ करून पदके जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी संबंधित संघटना, प्रशिक्षक यांनी खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला हवे. कुराश खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे, असे काका पवार यांनी नमूद केले.
