नागराज मंजुळे यांना समन्स; खाशाबा जाधव चित्रपटाचा वाद

नागराज मंजुळे यांना समन्स; खाशाबा जाधव चित्रपटाचा वाद

चित्रपटाची कथा सापडली वादाच्या भोवऱ्यात; मूळ कथालेखक संजय दुधाने यांची पुणे न्यायालयात धाव

 

पुणे: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. चित्रपटाची मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असून, त्यांनी कॉपीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्याविरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत न्यायालयाने नागराज मंजुळे यांच्यासह इतर प्रतिवाद्यांना समन्स पाठवले आहे.
खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क २००१ पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही दुधाणे यांच्याकडे आहे. चित्रपटाची निर्मिती व त्याचे प्रदर्शन करण्यास निरंतर मनाई व ठरावासाठी दुधाणे यांनी अ‍ॅड. रविंद्र शिंदे व अ‍ॅड. सुवर्णा शिंदे यांच्यामार्फत पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत स्वतः हजर होण्याचे समन्स न्यायालयाने मंजुळे व देशपांडे यांना पाठवले आहे.
गेल्या चार वर्षांत स्वतः नागराज मंजुळे यांच्यासोबत दोन, तर त्यांच्या वकिलांसोबत दोन समझोता बैठका झाल्या. मात्र, चारही बैठकांत निर्णय न झाल्याने अखेर संजय दुधाणे यांनी कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कोर्टात धाव घेतली आहे. चित्रपटाची मूळ कथा दुधाने यांची असताना मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांच्याशी बेकायदेशीर करार केल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
 
कोरोनापूर्वी २०१९ मध्ये मंजुळे यांनी रणजीत जाधव यांच्याशी करार केला होता. मूळात रणजीत जाधव यांनीच ३० ऑगस्ट २०१३ रोजी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन खाशाबांच्या चित्रपटाची कथा ही संजय दुधाणे यांची असल्याचे घोषित केले होते. मात्र, आता रणजीत जाधव यांनी दुधाणे यांना डावलून संमती करार केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात येताच दुधाणे यांनी मंजुळे यांची २०२० मध्ये रणजीत जाधव यांच्यासोबत पुण्यात भेट घेतली होती. त्यावेळी वाईमधील पटकथालेखक तेजपाल वाघही उपस्थित होते. चर्चेत लेखक म्हणून तुमचे नाव दिले जाईल व रणजीत जाधव यांच्याप्रमाणेच समान वाटा देऊन तुमचा मान राखला जाईल, असा शब्द नागराज मंजुळे यांनी दिला होता. रणजीत जाधव यांनीही या प्रस्तावाला होकार दिला होता, असे दुधाने यांनी दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे.
 
पुण्यातील बैठकीनंतर सकारात्मक प्रतिसाद न आल्याने २६ डिसेंबर २०२२ रोजी दुधाणे यांनी मंजुळे यांना नोटिस पाठवली. कथालेखकाच्या वादामुळे आपण चित्रपट करणार नाही, असे मंजुळे यांनी रणजीत जाधव यांना कळवले होते. त्यानंतर ५ जानेवारी २०२३ रोजी रणजीत जाधव यांनी त्यांच्या व नागराज मंजुळे यांच्या वकिलांसोबत दुधाणे यांची पुण्यात भेट घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली. दरम्यान जिओ स्टूडियोने खाशाबा चित्रपटाची घोषणा केल्याने मंजुळे यांच्या पुणे येथील स्टुडिओत ८ जुलै २०२३ रोजी रणजीत जाधव यांच्या वकिलासह एकत्रित समझोता बैठक घेतली. या बैठकीला शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित क्रीडा प्रशिक्षक रणजीत चामले व पत्रकार विठ्ठल देवकाते उपस्थित होते. संजय दुधाणे यांचे लेखक, संशोधक तसेच आभार प्रदर्शनात नाव देण्यात येईल व रणजीत जाधव यांच्याइतकेच समान मानधन देण्याचे ठरले होते.
 
नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रोडक्शनच्या स्टुडिओत झालेल्या बैठकीतील कराराबाबत नागराज मंजुळे व रणजीत जाधव यांनी उदासीनता दाखविल्याने दुधाणे यांनी नागराज मुंजुळे व जिओ स्टेडिओला कायदेशीर नोटिस पाठवली. यानंतर एका बड्या मध्यस्थीमार्फत नागराज मंजुळे यांचे वकील अ‍ॅड. रामकृष्ण कुलकर्णी यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये दोनवेळा प्रत्यक्ष भेटून समझोता करार लिहून आणला होता. तीन लाख रूपये देऊन पुस्तकाचे सर्व हक्क व चित्रपटाला ना हरकत देत आहेत, असे करारात लिहीले होते. संजय दुधाणे यांच्या पुस्तकाचे सर्व हक्क रणजीत जाधव यांना द्यावे, अशी अट करारात टाकण्यात आली होती. ही अट मान्य नसल्याने अखेर संजय दुधाणे यांनी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली.
चित्रपट अभिनेता रितेश देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनीद्वारे भारताचे पहिले ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्यावर ‘पॉकेट डानॉमो’ या चित्रपटाची निर्मिती केली जाणार होती. या चित्रपटाची कथा संजय दुधाणे लिखित ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या पुस्तकावर आधारित होती. चित्रपटाची पटकथा वाई येथील तेजपाल वाघ यांनी लिहिली होती. तसा करार मुंबई फिल्मकंपनीद्वारे चित्रपट समन्वक सुनील अभ्यंकर यांनी केला होता. या करारात साक्षीदार म्हणून रणजीत जाधव यांनी सही केली होती. याबाबत स्वतः रणजीत जाधव यांनी ३० ऑगस्ट २०१३ रोजी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन तसे जाहिर केले होते.
संजय दुधाणे लिखित ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ हे खाशाबांवरील पहिलेच व एकमेव पुस्तक आहे. यासाठी दुधाने यांनी खाशाबांच्या काळातील कुस्तीगीरांची भेट घेऊन परिपूर्ण माहिती एकत्रित केली होती. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते २००१ मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. या पुस्तकाची विक्रमी १५ वी आवृत्ती प्रकाशित झाली असून, या पुस्तकाला २००८ मध्ये सर्वोत्कृष्ठ क्रीडा पुस्तकाचा राज्य पुरस्कारही मिळाला आहे. २००४ मध्ये इयत्ता ९ वी व २०१५ मध्ये इयत्ता ६ वीच्या पाठ्यपुस्तकात या पुस्तकातील पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकाच्या आधारे तेजपाल वाघ यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली होती. त्यांनी पटकथा व संशोधन सर्व नागराज मंजुळे यांच्याकडे सुपूर्त केले होते. असे असताना संजय दुधाणे यांना अंधरात ठेवून मंजुळे चित्रपट निर्मिती करीत असल्याने हा वाद न्यायालयाच्या दारात पोहचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *