यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्यमशीलता जोपासावी

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्यमशीलता जोपासावी

डॉ. किरण कुलकर्णी यांचे मत; पुणे विद्यार्थी गृहात ‘एम्प्लॉयबिलिटी अँड आंत्रप्रेन्युअर सेल’चे उद्घाटन

पुणे : “नोकरी आणि व्यवसाय दोन्हीकडे उपयोगी पडणाऱ्या उद्यमशीलतेचा गुण अवगत केला पाहिजे. उद्योजकतेप्रमाणेच नोकरीमध्येही यशस्वी होण्यासाठी ‘इंट्राप्रेन्युर’ बनावे लागते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना माहितीपेक्षा ज्ञानावर अधिक भर दिला पाहिजे,” असे मत सनदी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
 
पुणे विद्यार्थी गृहाचे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि जी. के. पाटे (वाणी) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या विद्यमाने अभियंता दिनानिमित्त आयोजित ‘नॉलेज रिसोर्स सेंटर’ आणि ‘लक्ष्य इन्स्पायर क्लब’च्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कुलकर्णी बोलत होते. यावेळी नॉलेज रिसोर्स सेंटरच्या ‘एम्प्लॉयबिलिटी अँड आंत्रप्रेन्युर सेल’चे उद्घाटन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, हाऊस ऑफ सक्सेस इन्फोमिडीयाचे संचालक प्रसाद मिरासदार, देआसरा फाउंडेशनच्या व्यवस्थापक ऐश्वर्या कुलकर्णी, एज्युटेक कॅटेलिस्ट भुवनेश कुलकर्णी आणि पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे अध्यक्ष सुनील रेडेकर उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना ऐश्वर्या कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता घडवण्यासाठी देआसरा फाउंडेशन करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. पुणे विद्यार्थी गृह नॉलेज रिसर्च सेंटरसाठी पुणे विद्यापीठ रिसर्च पार्क सेंटर आणि हाऊस ऑफ सक्सेसचे सहकार्य लाभले आहे. या ज्ञानस्त्रोत केंद्राचा पहिला उपक्रम म्हणून प्रसाद मिरासदार यांनी सुनील रेडेकर व डॉ. अरविंद शाळीग्राम यांची मुलाखत घेतली.
 
सुनील रेडेकर म्हणाले, “पुणे विद्यार्थी गृहाने १९२६ साली पहिल्यांदा कमवा आणि शिका उपक्रम सुरू केला. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले व पुढे छपाई उद्योगाचा पाया रचला. संस्थेत तयार होणाऱ्या भिंगांचा वापर रणगाड्यातील दुर्बीणींसाठी केला जात असे.”
 
डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी चांद्रयानाच्या यशस्वी मोहीमेत पुण्यातील अनेक अभियंतांचा सहभाग कसा महत्वपूर्ण होता, याची माहिती दिली. बदलत्या काळात नॉलेज रिसोर्स सेंटरसारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे ज्ञान होईल, असे सांगितले. यावेळी भुवनेश कुलकर्णी परिवाराने दिलेल्या देणगीतून सर्वोत्तम अभियांत्रिकी प्रकल्प सादर केलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना गौरविण्यात आले. यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *