विद्यार्थ्यांनी जपले वृद्धांशी सौहार्द : ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांची जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमाला भेट

विद्यार्थ्यांनी जपले वृद्धांशी सौहार्द : ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांची जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमाला भेट

सूर्यदत्त ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांची जनसेवा फाउंडेशनला भेट
 

पुणे : आंबी येथील जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमाला सूर्यदत्त ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘एज्यु-सोशिओ कनेक्ट’ अभियानांतर्गत नुकतीच सौहार्दपूर्ण भेट दिली. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सदर भेटीचे आयोजन करण्यात आले. तेथील वृद्धांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्यवर्धनाच्या दृष्टीने त्यांना रजई वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये भवतालाच्या संदर्भात जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना समाजसेवेचा अनुभव मिळावा, सामाजिक जबाबदारीचे भान यावे, त्यांचा ज्येष्ठ नागरिकांशी संवाद घडावा व त्यांना वृद्धांच्या समस्या जाणून घेता याव्यात या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थी व शिक्षकांनी वृद्धाश्रमातील रहिवाशासमवेत वेळ घालविला, त्यांची आपुलकीने विचारपूस केली व त्यांच्यासाठी उत्स्फूर्तपणे कलागुण सादर केले. या उत्स्फूर्त सादरीकरणाचा ज्येष्ठ नागरिकांनी मनापासून आनंद घेतला आणि स्वयंप्रेरणेतुन कला सादर करत आपलाही सहभाग नोंदविला. 

 
येथील ज्येष्ठ नागरिकाना भेटून आम्हाला आमच्या आजी-आजोबांची आठवण आली त्यामुळे ही भेट आमच्यासाठी डोळ्यात अंजन घालणारी होती, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आपल्या घरातील ज्येष्ठांची नीट काळजी घेण्याची व त्यांच्या बरोबर दर्जेदार वेळ घालवाण्याची प्रतिज्ञाही विद्यार्थ्यांनी यावेळी केली. ‘सूर्यदत्त’च्या क्लोदिंग बँक प्रकल्पाअंतर्गत सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्र ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रजया भेट देण्याचा कार्यक्रम यावेळी झाला. 
 

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन केले. ‘सूर्यदत्त’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी प्रकल्पांचे विवेचन केले. तसेच वृद्धाश्रमातील व्यक्तींच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे स्पष्ट केले. वृद्धाश्रमांची गरजच भासू नये याकरिता सूर्यदत्तचे विद्यार्थी मूल्यशिक्षणाच्या माध्यमातून तयार करण्याचे तगडे आव्हान ‘सूर्यदत्त’ पेलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. मनीषा कुंभार, डॉ. सिम्मी रेठरेकर, रोहित संचेती, डॉ. कांचन गोडे, डॉ. नेहा भोसले, डॉ. विद्या गवेकर, डॉ. मेधा देशमुख, डॉ. रेखा चौहान, प्रा. सुवर्ण पाटील, प्रा. मेधा माने, प्रिया सावरकर, प्रज्ञा पाडेकर, बटू पाटील आदींनी या भेटीकरिता संयोजन केले. जनसेवा फाउंडेशन, आंबी येथील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
——————
फोटो कॅप्शन – 

– जनसेवा फाउंडेशन, आंबी पानशेत संस्थेस रजई भेट देतांना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, ‘सूर्यदत्त’चे विद्यार्थी व स्टाफ. सोबत जनसेवा फाउंडेशनच्या ज्येष्ठ नागरिक गृहातील रहिवासी.
– ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांसमवेत कला सादर करताना जनसेवा फाउंडेशनचे ज्येष्ठ नागरिक.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *