तणावमुक्तीसाठी ज्येष्ठांचे ‘हसायदान’

तणावमुक्तीसाठी ज्येष्ठांचे ‘हसायदान’

नवचैतन्य’ परिवारातर्फे ऑनलाइन क्लब

पुणे : कोरोना आणि पर्यायाने लागलेल्या निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे बहुतेक नागरिक घरातच आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा सार्वजनिक उपक्रमांमधील सहभाग तर जवळजवळ बंदच झाला आहे. मात्र उतारवयातील तोच एक विरंगुळाही बंद झाल्याने अनेक ज्येष्ठांना तणावाचा सामना करावा लागतो आहे. यावर नवचैतन्य हास्ययोग परिवाराने ‘हास्ययोगा’च्या मात्रेचा उपाय व्हिडिओ कॉलद्वारे शोधला आहे. आजघडीला ज्येष्ठ नागरिकांसाठी या ऑनलाइन हास्यक्लबमध्ये सुमारे साडेतीन हजार सदस्य दररोज या हास्य थेरपीचा लाभ घेत आहेत.

नवचैतन्य हास्ययोग परिवाराची स्थापना १९९७ मध्ये झाली. या परिवारात १८० हास्यक्लबच्या शाखा असून सुमारे पंधरा हजार सदस्य आहेत. शहरातील विविध उद्यानांमध्ये या हास्यक्लबचे उपक्रम होत असत. मात्र कोरोनामुळे उद्याने बंद असताना हे उपक्रम थंडावले. यावर उपाय म्हणून ऑनलाइन हास्यक्लब चालू करण्याची संकल्पना मकरंद टिल्लू यांनी मांडली. त्यातूनच ‘हसायदान’ अशा समर्पक नावाने ऑनलाईन हास्यक्लबची शाखा सुरू करण्यात आली. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आता ते सहजपणे मोबाईल हाताळत आहेत आणि ऑनलाइन हास्यक्लबचा आनंद घेत आहेत. ऑनलाइन पद्धतीमुळे काही परदेशांतील नागरिकही यात सहभागी होत आहेत, असे परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी सांगितले.

घराबाहेर पडता येत नसल्याने आपण विविध आनंदांना मुकत आहोत, ही भावना ज्येष्ठ नागरिकांच्या मनातून नाहीशी व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठीच हास्यक्लबसह सदस्यांचे वाढदिवस साजरा करणे, व्याख्यानमाला, आरोग्यविषयक कार्यशाळांचे आयोजन, प्रसिद्ध कलाकारांच्या मुलाखती, गप्पांचा कट्टा असे नानाविध उपक्रमही यामार्फत घेतले जात आहेत.

“हास्य थेरपी ही शास्त्रीय पद्धत’
“शारीरिक व्यायामासह आपल्याला मनाच्या व्यायामाचीही गरज असते. हास्य थेरपी ही दोहोंसाठी उपयुक्त असते. त्याचे फायदे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहेत. वारंवार हसून मनाला सकारात्मक विचारांची सवय लावता येते, तसेच तणाव कमी होतो. तसेच शारीरिक आरोग्यालाही यामुळे कायदा होतो. फुप्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी, हृदय निरोगी ठेवण्यासाठी, रक्ताभिसरण व पचनक्रिया सुधारण्यासाठी हसण्याचा फायदा होतो. प्रांरभी सूक्ष्म व्यायाम, त्यानंतर प्राणायाम आणि त्यानंतर हास्ययोग अशा तीन टप्यात हा उपक्रम होतो,” असे या उपक्रमाचे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *