…आणि दात्याने विद्यार्थी साहाय्यक समितीला दिले एक कोटी

…आणि दात्याने विद्यार्थी साहाय्यक समितीला दिले एक कोटी

अमेरिकेतील शेणॉय दाम्पत्याकडून विद्यार्थी साहाय्यक समितीला एक कोटी

पुणे : अमेरिकेतील सुनील आणि साधना शेणॉय दाम्पत्याकडून विद्यार्थी साहाय्यक समितीच्या ‘एफसीआरए’ (विदेशी योगदान नियमन कायदा) खात्यात एक लाख १५ हजार डॉलर म्हणजेच ९५ लाख २५ हजार रुपयांची देणगी जमा केली. गेल्या वर्षी त्यांनी ६२०० डॉलर पाठवले होते. एक फेसबुक पोस्ट वाचनात आली अन या दाम्पत्याने चौकशी करत माहिती घेत, समितीत येऊन देणगी द्यायला सुरुवात केली.

शेणॉय कुटुंबीय समितीचे विश्वस्त डॉ. मकरंद फडके यांचे फेसबुक फ्रेंड आहेत. डॉ. फडके यांच्या फेसबुक पोस्टवरून त्यांना समितीच्या कार्याविषयीची माहिती मिळाली. त्या पोस्टला प्रतिसाद म्हणून त्यांनी प्रथम ६२०० डॉलर पाठवले होते. गेल्या जानेवारीमध्ये शेणॉय कुटुंबीयांनी पुण्यातील मुलींच्या नवीन वसतिगृह बांधकामाला भेट दिली. त्यावेळी त्यांना समिती कार्याची विस्तृत माहिती मिळाली. समितीचे सेवाभावी काम पाहून ते प्रभावित झाले व आणखी एक लाख डॉलर देण्याचा मानस व्यक्त केला. प्रत्यक्षात काल १ लाख १५ हजार डॉलर पाठवले.

“सोशल मीडियाच्या माध्यमातून समितीला एवढी मोठी मदत (अंदाजे १ कोटी रु) मिळाली, याचे समाधान आहे. जेव्हा आपले काम प्रामाणिक, पारदर्शी आणि समाजाभिमुख असते; तेव्हा समाजाचा त्यावर विश्वास दृढ होतो आणि सढळ हाताने देणगी येते. ही त्याची पावतीच आहे. साधना व सुनील शेणॉय आणि डॉ. मकरंद फडके यांच्याप्रती समिती परिवार ऋणी आहे,” असे विश्वस्त तुकाराम गायकवाड यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *