शोकसभेत मान्यवरांच्या भावना; इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूट देणार ‘एस. डी. लिमये स्मृती पुरस्कार’
पुणे : ‘पुण्याचे मेट्रोमॅन’ अशी ओळख मिळालेल्या ज्येष्ठ अभियंता शशिकांत लिमये यांचे कोकण रेल्वे निर्माणात, अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय आहे. रेल्वेच्या विकासासाठी त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूटतर्फे यंदापासून ‘एस. डी. लिमये स्मृती पुरस्कार’ देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष उज्ज्वल कुंटे यांनी यावेळी जाहीर केले. कुटुंबीयांनीही त्यांच्या हृद्य आठवणींना उजाळा दिला.
शशिकांत लिमये यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. दि इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूट यासह लिमये यांचे सक्रिय योगदान व मार्गदर्शन लाभलेल्या तांत्रिक व शैक्षणिक संस्थांच्या वतीने त्यांच्या शोकसभेचे आयोजन केले होते. फिरोदिया सभागृहात झालेल्या या शोकसभेला यावेळी पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे केंद्राचे माजी सचिव वसंतराव शिंदे, ‘सीओईपी’च्या प्राध्यापिका डॉ. सुहासिनी माढेकर, इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष उज्ज्वल कुंटे, इंडियन ब्रिज इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष प्रा. व्ही. आर. फडके, इंडियन जिओ टेक्निकलचे अध्यक्ष रमेश कुलकर्णी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे निवृत्त उपाध्यक्ष श्यामकांत धर्माधिकारी, अनिल जगताप, लिमये यांच्या पत्नी गीतांजली, कन्या योगिता, विनिता व बंधू रवींद्र लिमये उपस्थित होते.
अतुल गाडगीळ यांनी लिमये यांच्या मेट्रो प्रकल्पासाठीच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. बंधू एअर व्हाईस मार्शल रवींद्र लिमये यांनी भावना व्यक्त केल्या. कोकण रेल्वे निर्माण कार्यात त्यांनी मुख्य अभियंता म्हणून काम पहिले होते. रेल्वेतील त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सेतू निर्माण केले. त्यांना त्यांच्या समृद्ध तांत्रिक कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यापैकी सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचा मानाचा एस. बी. जोशी स्मृती पुरस्कार, आयआयटी पवईचा गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, तसेच इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूटच्या जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता.
सूत्रसंचालन वसंतराव शिंदे यांनी केले. आभार इंजि. मुनोत यांनी मानले.