शिलाई मशीन, प्रशिक्षणामुळे उत्पादकता वाढेल

शिलाई मशीन, प्रशिक्षणामुळे उत्पादकता वाढेल

सुषमा चोरडिया यांचे मत; उरवडेतील महिला बचत गटांना शिलाई मशीनचे वाटप व प्रशिक्षण

पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्त वुमेन एम्पॉवरमेंट अँड लीडरशिप अकॅडमीच्या (स्वेला) वतीने आणि सेवा सारथी फाउंडेशनच्या सहकार्याने उरवडे गावातील महिला बचत गटांना मोफत शिलाई मशीन वाटप व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भागातील महिला बचत गटांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला.

‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, सेवा सारथी फाउंडेशनचे अमित तोडकर, मार्गदर्शिका कल्पना शिंदे, धनश्री पिसे, उरवडे ग्रामपंचायतीचे आजीमाजी पदाधिकारी व सभासद, समीर शेलार, वैभव मुरकुटे, मंगला खोपकर, संगीत भिंगारे, प्रशांत मुंडे आदी उपस्थित होते.

सुषमा चोरडिया म्हणाल्या, “सूर्यदत्त संस्था नेहमीच समाजकार्यात पुढाकार घेते. तळागाळातील लोकांसह, गरजू व प्रज्ञावंत लोकांना साहाय्य करण्याच्या भावनेतून संस्थेचे काम सुरु आहे. नॉलेज बँक, फूड बँक, क्लोदिंग बँक अशा विविध उपक्रमातून शिष्यवृत्ती, अन्नधान्य, कपड्यांचे व इतर साहित्याचे वाटप करण्यात येते. रिक्षावाले, रेल्वेस्टेशनवरील श्रमजीवी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. एज्यु-सोशियो उपक्रमांतर्गत महिला सक्षमीकरण व समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात.”

याआधीही संस्थेने अशा प्रकारचे उपक्रम राबवले आहेत. आगामी काळात मुळशी आणि हवेली तालुक्यातील गावांत शिलाई मशीन वाटप व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. उपलब्ध करून देण्यात आलेल्या शिलाई मशीनचा योग्य वापर व्हावा, चांगले प्रशिक्षण घेऊन उत्पादकता वाढवावी, मिळणाऱ्या उत्पन्नातून घरखर्चाला हातभार लावावा, अशी अपेक्षा सुषमा चोरडिया यांनी व्यक्त केली. या उपक्रमाच्या यशानंतर बचत गटांना इतर साधने उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रा. सुनील धाडीवाल यांनी ‘सूर्यदत्त’मध्ये असलेल्या केजी टू पीजी अभ्यासक्रमांतील प्रगती विशद केली. तसेच संस्थेच्या १०० टक्के निकाल, विविध उपक्रम, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार, विविध संस्थांकडून ‘सूर्यदत्त’ला मिळालेले पुरस्कार व मान्यता याविषयी माहिती सांगितली.

सूर्यदत्त संस्थेकडून सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे सेवा सारथी फाउंडेशन सर्वतोपरी सहकार्य करत असून, अधिकाधिक प्रभावी समाजकार्य उभारावे, असे अमित तोडकर यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *