सकारात्मक, तणावमुक्त आयुष्यासाठी आत्मबोध व शांतता महत्वाची
श्री भूपेंद्र यांचे प्रतिपादन; अमेरिकेतील सर्कल ऑफ कॉन्सिएसनेस अँड हॅप्पीनेस व सोल फाउंडेशन इंडियातर्फे ‘मेटा अवेकनिंग’ कॉन्सर्ट
पुणे: “जीवन एक नृत्यकला, उत्सव आहे. त्यामुळे आयुष्यातील चढ-उतारांतून मार्ग काढता आले पाहिजेत. आपल्यामधील क्षमता ओळखून सकारात्मक, तणावमुक्त जीवन जगण्याची कला अवगत करावी. चेहऱ्यावरील हास्य, मनातील समाधान आणि आत्मिक सुखाची अनुभूती घेत आनंदी जीवन जगावे,” असा अनुभव जागतिक ख्यातीचे तत्वज्ञ-शास्त्रज्ञ, लेखक व अध्यात्मिक ऊर्जेचे प्रभावक श्री भूपेंद्र यांनी दिला. आत्मबोध व दोन विचारांतील, दोन श्वासांतील शांतता आपल्याला यामध्ये वाहक म्हणून उपयुक्त ठरतात, असे त्यांनी नमूद केले.
वैज्ञानिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक याचा त्रिवेणी संगम असलेल्या ‘मेटा अवेकनिंग’ या कार्यक्रमातून पुणेकरांना आत्मिक संजीवनीची अनुभूती मिळाली. तत्वज्ञ-शास्त्रज्ञ श्री भूपेंद्र यांच्या ऊर्जादायी मार्गदर्शन व सहवासाने अनेकांच्या जीवनात आनंद पेरला. सर्कल ऑफ कॉन्सिएसनेस अँड हॅप्पीनेस कॅलिफोर्निया (अमेरिका) आणि सोल फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल रामी ग्रँड येथे ‘मेटा अवेकनिंग’ कॉन्सर्टचे आयोजन केले होते. लेव्हल अपचे संस्थापक प्रा. डॉ. श्रीकांत कल्लूरकर, अलार्ड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. पूनम कश्यप, पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे, कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये, धनश्री नानिवडेकर, आद्या ज्वेलरीच्या सायली मराठे, इंडिगो रूट्सच्या सुषमा चोपडा, सर्कल ऑफ कॉन्सिएसनेस अँड हॅप्पीनेस कॅलिफोर्नियाच्या (अमेरिका) प्रतिनिधी कीर्ती गद्रे आदी उपस्थित होते.
श्री भूपेंद्र यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या तपश्चर्येतून त्यांना समजलेला जीवनाचा अन्वयार्थ उपस्थितांना सांगितला. हीलिंग, मेडिटेशन व सांस्कृतिक कार्यक्रम आणि श्री भूपेंद्र यांच्या अमोघ वाणीतील मार्गदर्शनाने सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यात शांतता व आत्मबोधाचे महत्व अधोरेखित केले. गुरु अष्टकम, निर्वाण षटकं, कृतज्ञता भावगीत यातून कलाकारांनी मनोहारी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. जवळपास २५० पुणेकरांनी यामध्ये सहभागी होत कॉन्सर्टची अनुभूती घेतली.
श्री भूपेंद्र म्हणाले, “ईश्वर, आत्मा आणि नशीब या विश्वास ठेवण्याच्या, तर जगण्यातील अडचणी, त्यावरील उपाय आणि स्वतःतील क्षमता या जाणून घेण्याच्या गोष्टी आहेत. निसर्गातून आपल्याला खूप शिकायला मिळते. वाघ किंवा गरुड जसा शिकार करताना ध्येयवादी असतो, त्याप्रमाणे आपण ध्येयवादी असायला हवे. भविष्याची चिंता करत बसण्यापेक्षा अनुभवलेल्या कठीण प्रसंगातून प्रेरणा घेत वाटचाल केली पाहिजे. प्रत्येकामध्ये ‘जिनियस’ दडलेला असतो. आपण स्वतःला ओळखून क्षमतांचा विकास करत ‘जिनियस’ बनण्याची गरज आहे. त्यासाठी कोणत्याही दोन घटकांमध्ये दडलेली शांतता अनुभवता यावी. त्यातूनच आयुष्याची रहस्ये उलगडतात.”
“आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस हा उत्सव साजरा करत नाही. आयुष्यात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही शक्ती महत्त्वाच्या आहेत. स्वतःची स्वतःशी ओळख होणे गरजेचे आहे. ही गोष्ट साध्य झाली, तर आपण आपली सर्व ध्येय सहजरीत्या पूर्ण करू शकतो. त्यासाठी स्वतःतील क्षमता आणि हीलिंगची शक्ती जाणून घ्यावी. माणूस स्वतःची सावली सोडून जाऊ शकत नाही किंवा स्वतःची सावली बनू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जशी आहे, तशी स्वीकारावी. स्वतःवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःची ओळख करून घेणे अधिक महत्वाचे आहे,” असेही श्री भूपेंद्र यांनी नमूद केले.
कीर्ती गद्रे म्हणाल्या, “पुणेकरांना मेटा अवेकनिंग या जागतिक चळवळीची ओळख करून देणारा हा कार्यक्रम होता. आपल्यातील जाणीव-नेणिवांना हात घालणाऱ्या या कॉन्सर्टमधून अनुभूती मिळते. सर्वांसह स्वतःला जोडण्याची ही प्रक्रिया आहे. ‘विश्वास’ आणि ‘ज्ञान’ या दोन संकल्पनांचा नेमका अर्थ यातून उलगडतो. स्वओळख हे तत्वज्ञान नसून, भूपेंद्रजी यांनी सिद्ध केलेले शास्त्र आहे. याचा उपयोग लाखो लोकांना होत आहे. यशाचे मार्ग कसे खुले होतात, हे आम्ही अनुभवतो आहोत. तुम्हालाही हे सगळे अनुभवता यावे आणि यशाचे मार्ग खुले व्हावेत, या उद्देशाने संस्थेने जगभर हा उपक्रम घेण्यास सुरुवात केली. मेटा अवेकनिंग युगाची ही सुरवात आहे.”