‘बालशिक्षण’मध्ये ४० वर्षानंतर पुन्हा भरली शाळा!

‘बालशिक्षण’मध्ये ४० वर्षानंतर पुन्हा भरली शाळा!

शताब्दी वर्षानिमित्त स्नेहमेळावा, रक्तदान शिबीर व जुने कपडे संकलन उपक्रम

पुणे : सकाळी घंटानाद… प्रार्थना… वर्गखोल्या, आवारात केलेला दंगा… वार्षिक स्नेहसंमेलनात सादर केलेले विविध गुणदर्शन… मित्रांशी गप्पा मारत खाल्लेला डबा… आवडत्या बाईंकडून गिरवलेले धडे… ३५-४० वर्षानंतर सगळे काही अनुभवताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

निमित्त होते, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या डेक्कन जिमखाना येथील बालशिक्षण मंदिर शाळेच्या १९८१-९० या दशकातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे! शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून, रविवारी स्नेहमेळावा, रक्तदान शिबीर आणि जुन्या कपड्यांचे संकलन करण्यात आले. विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत या विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली व आठवणींना उजाळा दिला.

प्रसंगी शाळा समितीच्या अध्यक्षा आनंदी पाटील, महामात्र सुधीर भोसले, मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, शिशु विभागाच्या रोहिणी फाळके यांच्यासह माजी विद्यार्थी मावळचे प्रांत संदेश शिर्के, प्रसिद्ध डॉ. वीरेंद्र घैसास, डॉ. श्रीधर चिपळूणकर, निवृत्त कर्नल अमित कासोदेकर, बोईंग इंडियाचे उपाध्यक्ष अंकुर कनंगलेकर, तेजा दिवाण आदी उपस्थित होते.

निवृत्त शिक्षिका सुनीता पत्की, अंजनी गोसावी, सरिता भाटवडेकर, वासंती औटी, अनुराधा शेंबेकर, अंजनी वारकर, अश्विनी भिडे, कमल फरांदे यांचा विद्यार्थ्यांनी आशीर्वाद घेतला. विद्यार्थ्यांच्या यशाने या शिक्षिका देखील भारावून गेल्या.

शताब्दी वर्षातील स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने १०० माजी विद्यार्थ्यांचे रक्तदान शिबीर आणि जुन्या कंपड्यांचे संकलन करण्यात आले. हे कपडे गुडविल इंडिया फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन यांना देण्यात येणार आहेत. जीर्ण कपड्यांच्या गोधड्या व सतरंज्या बनवून त्या रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड व रस्त्याकडेला राहणाऱ्या गरजूना वितरित करणार असल्याचे आनंदी पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *