पुणे: कोरोनाध्या पार्श्वभूमीवर यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ रद्द करण्यात आला आहे. येत्या २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान या महोत्सवाचे ६८वे पर्व शहरात होणार होते.
राज्यात शहरात व वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या आणि प्रशासनाकडून लागू केलेल्या नव्या नियमावलीमुळे यंदाचा महोत्सव रद्द केल्याचे महोत्सवाचे आयोजक आणि आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले. यंदा पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा, अशी रसिकांची प्रबळ इच्छा होती. परंतु, महोत्सवाची भव्यता, व्याप्ती व आयोजनासाठी लागणारा वेळ बघता यंदाचा महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. गेली दोन वर्षे कोरोनामुळे महोत्सवाचे आयोजन करणे शक्य झाले नव्हते. यंदा फेब्रुवारी महिन्यात आयोजन होणार असल्याची घोषणा झाल्यावर संगीतप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, या निर्णयामुळे रसिकांच्या या आनंदावर पाणी फेरले आहे.
यापूर्वीही झाला होता रद्द
पानशेतच्या पुरामुळे यापूर्वी १९६१ मध्ये ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ जाहीररीत्या होऊ शकला नव्हता. मात्र नानासाहेब देशपांडे यांच्या ‘आलापिनी’ बंगल्यावर हिराबाई बडोदेकर, पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे, पं. फिरोज दस्तूर यांनी खासगी मैफिलीद्वारे सवाई गंधर्व यांना अभिवादन केले होते. त्यानंतर २००९ मध्ये सार्स विषाणूमुळे महोत्सव पुढे ढकलला जाऊन तो २०१० मध्ये जानेवारी महिन्यात पार पडला, तर २०१४ मध्ये अवकाळीमुळे महोत्सव २०१५ च्या जानेवारी महिन्यात झाला होता. यंदा कोरोनामुळे सलग तिसऱ्या वर्षीही महोत्सवाचे आयोजन रद्द करण्यात आले आहे.