पुणे : अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे ‘संत तुकाराम वैश्विक कथा लेखन स्पर्धा’ आयोजित केली आहे. कथेला विषयाचे बंधन नसून मराठी भाषेत लिहिलेली कथा दि. ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. या स्पर्धेत जगातील कोणीही स्पर्धक, लेखक सहभागी होऊ शकतात.
या कथा स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००१, १००१, ५०१ रुपयांची रोख रक्कम व पुस्तके, संत तुकाराम महाराजांची प्रतिमा देऊन, तर इतर सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. या स्पर्धेला सॅन अँड ओशन ग्रुप, संजय घोडावत पॉलिटेक्निक, एमजीएम विद्यापीठ, बोल भिडू, मुराळी, रिंगण, साकेत प्रकाशन, उचित मीडिया, सिद्धांत मीडिया, सारद मजकूर, हर्मिस प्रकाशन, सुमन ग्राफिक्स आदी संस्थांचे सहकार्य लाभले आहे.
“संत तुकाराम हे भाषा, प्रदेश यांच्या पुढे जाणारे वैश्विक दर्जाचे श्रेष्ठ विचारवंत, साहित्यिक होते. त्यांचा आदर्श कायम आपल्यासमोर रहावा, त्यांचे स्मरण व्हावे आणि दर्जेदार लेखनाला व नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी ही कथा स्पर्धा आयोजित केली आहे,” असे अक्षरदानचे संपादक मोतीराम पौळ यांनी सांगितले.