आझाद यांच्यावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी ,मंत्रिमंडळ विस्तारात ‘रिपाइं’ला मंत्रिपद मिळावे; रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत मागणी

आझाद यांच्यावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी ,मंत्रिमंडळ विस्तारात ‘रिपाइं’ला मंत्रिपद मिळावे; रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत मागणी

आझाद यांच्यावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी
मंत्रिमंडळ विस्तारात ‘रिपाइं’ला मंत्रिपद मिळावे; रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत मागणी
 
पुणे : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेश मध्ये झालेला हल्ला दुर्दैवी आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. या हल्ल्याचा निषेध करतो. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने याची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करायला हवी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.
 

नवीन विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी रिपाइं प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, नेते परशुराम वाडेकर, असीत गांगुर्डे, चंद्रकांता सोनकांबळे, संजय सोनवणे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, ऍड आयुब शेख, महिपाल वाघमारे, मोहन जगताप आदी उपस्थित होते.

 
रामदास आठवले म्हणाले, “भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मित्र पक्षांची मुंबईत बैठक झाली असून, आगामी मंत्रिमंडळ विस्तारत ‘रिपाइं’ला एक मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. तसेच जागा वाटपात विधान परिषदेची एक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत योग्य वाटा मागितला आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण रोटेशन पद्धतीने होत आहे. मात्र, जिथे दलित वस्ती नाही, तिथे आमचा माणूस निवडून येत नाही. म्हणून आरक्षणाची रोटेशन बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करत आहोत.”
 
विरोधकांची एकजूट
देशातील विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकवटले आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मोदी लोकप्रिय आणि सक्षम नेते आहेत. आगामी निवडणुकीत ३५० च्या वर जागा निवडून येतील आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. जितके विरोधक एकत्र येतील, मोदींची तितकीच ताकद वाढेल, असे आठवले यांनी सांगितले.
 
सरकारची कामगिरी चांगली
वेगवेगळ्या क्षेत्रात भारताने आघाडी घेतली असून, रोजगार निर्मितीस प्राधान्य दिले जात आहे. लाखो लोकांना सरकारी नोकरीत सामावून घेतले जात आहे. खासगी उद्योगास प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यातही उद्योग वाढवले जात असून, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. विरोधकांनी प्रत्येक गोष्टीला विरोध करणे चुकीचे आहे. सरकारला सहकार्य करणे ही लोकशाही आहे.
 
मराठा आरक्षणाला विरोध नाही
मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, आमच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण त्यांना द्यावे, असे आमचे म्हणणे आहे. भटक्या विमुक्त, ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्याबाबत अभ्यास सुरु आहे. त्याचा फायदा सर्व समाजाला होईल. जातीनिहाय जनगणना झाली, तर सर्वांना कोणत्या जातीचे किती प्रमाण आहे, ते समजेल. याबाबत सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे.
 
शिंदे-फडणवीस दमदार
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार चांगले चालले असून, वर्षपूर्तीच्या त्यांना शुभेच्छा देतो. या सरकारला कोणताही धोका नाही. शिंदे-फडणवीस आपला कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढील पाच वर्षे त्यांचीच सत्ता येईल. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणे योग्य नव्हते. दर्शन घ्यायचेच असेल, तर चैत्यभूमीत जाऊन बाबासाहेबांचे व रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यावे.
 
गुलाबी रंग चालणार नाही
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांचा गुलाबी रंग महाराष्ट्रात चालणार नाही. नाराज नेत्यांना घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. छगन भुजबळ यांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारी नाही. भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांचे आमच्या पक्षात स्वागतच आहे. पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याचे आमंत्रण देणार नाही, मात्र मिटवून घेण्याचा सल्ला देईन.
 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *