प्रत्येक भारतीयावर लोकशाही, संविधान टिकवण्याचे दायित्व

प्रत्येक भारतीयावर लोकशाही, संविधान टिकवण्याचे दायित्व

ॲड. उल्हास बापट; संविधान सन्मान समिती, सम्यक ट्रस्ट, ‘रिपाइं’तर्फे ‘भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सव’वर परिसंवाद
 
पुणे : “भारतीय हीच जात व धर्म मानून प्रत्येकाला समान संधी, अधिकार व सन्मान देणारे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले. याच संविधानावर आधारलेली भारतीय लोकशाही जगात आदर्शवत आहे. परंतु, अलीकडच्या काही दिवसांत लोकशाही, संविधानाची मूल्ये पायदळी तुडवत त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु, धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा पाया असून, संविधानाच्या मूळ रचनेला हात घालता येत नाही. संविधान व लोकशाहीवर होणारे हे आघात परतवून लावण्याचे आणि ते टिकवण्याचे दायित्व प्रत्येक भारतीयांवर आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ घटनातज्ज्ञ व विधिज्ञ ॲड. उल्हास बापट यांनी केले. 
 
 
संविधान सन्मान समिती, सम्यक ट्रस्ट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या संयुक्त विद्यमाने अमृतमहोत्सवी संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन व ‘भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सव’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. प्रसंगी ॲड. उल्हास बापट बोलत होते. ‘रिपाइं’चे राज्य सचिव बाळासाहेब जानराव अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक प्रा. डॉ. प्रकाश पवार, शहराध्यक्ष संजय सोनावणे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते अंकल सोनवणे, ॲड. मंदार जोशी, ॲड. अर्चिता जोशी, बाबुराव घाडगे, रघुनाथ ढोक, शाम सदाफुले, निलेश आल्हाट, निलेश रोकडे, जयदीप रंधवे आदी उपस्थित होते. उल्लेखनीय यश मिळवलेल्या उज्ज्वला जयदेव रंधवे, चंद्रिका पुजारी, श्रावणी रोकडे, ऋतिका धिवार या विद्यार्थ्यांचा गौरव, तसेच नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या व अपेक्षित प्रश्नसंच वितरण यावेळी करण्यात आले.
 
 
प्रा. डॉ. प्रकाश पवार म्हणाले, “संविधानानाने देशाची एकता, एकात्मता अणि राष्ट्रीयत्व बहाल केले आहे. त्याचे संरक्षण करण्याचे दायित्व १४० कोटी लोकांवर आहे. संविधान हा आपल्या जगण्याचा मुख्य दस्तावेज असून, त्याचा उचित सन्मान व्हावा. गेल्या ७५ वर्षात संविधान केवळ एक टक्के लोकांपर्यंत पोहोचले आहे. ९९ टक्के लोक जेव्हा संविधान समजून घेतील, अंगीकार करतील, तेव्हा सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही. आरक्षणाच्या नावाने आवाज उठवणारे लोक खासगीकरण, संवैधानिक संस्था विक्रीला काढल्यात, त्यावर बोलत नाहीत, हे खेदजनक आहे. पुढील काळात संविधान अधिक व्यापकपणे रुजवण्याचे काम करावे लागेल.”

बाळासाहेब जानराव म्हणाले, देशाला एकसंध ठेवत जनतेला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या भारतीय संविधानाचा समावेश प्राथमिक शाळांमधून शिकवणे गरजेचे आहे. संविधान साक्षरतेची शालेय अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश व्हावा. त्यातून संविधानाबद्दल अनेकांच्या मनात असणारे अज्ञान दूर होण्यास मदत होईल. डॉ. आंबेडकरांचे विचार समजून घ्यावेत. संविधान सन्मान समितीच्या संविधानाबद्दलचे अज्ञान दूर करण्यासाठी माध्यमातून शाळा, महाविद्यालयातून आम्ही जागृती करत आहोत.”
 
 
 
अशोक कांबळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. बाबुराव घाडगे यांनी आभार मानले. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची फुलांनी सजावट संस्थेच्या वतीने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *