डॉ. अनिल कोहली यांचे मत; एम. ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयात ‘इस्थमस २०२२’ आंतरराष्ट्रीय दंत परिषदेचे उद्घाटन
पुणे : “दंतवैद्यक क्षेत्रात संशोधन, आधुनिक उपचार पद्धती विकसित व्हाव्यात. नवतंत्रज्ञान, भारतीय बनावटीची उपकरणे आणि आधुनिक उपचार पद्धती विकसित झाली, तर दातांवरील उपचार सामान्यांच्या आवाक्यात येतील. दात हे आपल्या शरीराचा आरसा असून, त्याचे आरोग्य जपण्याबाबत जागृती गरजेची आहे,” असे मत इंडियन एंडोडोंटिक सोसायटीचे संस्थापक डॉ. अनिल कोहली यांनी व्यक्त केले.
एम. ए. रंगूनवाला डेंटल कॉलेज, इंडियन एंडोडोंटिक सोसायटी आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इस्थमस २०२२’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय दंत परिषदेच्या उद्घाटनावेळी डॉ. अनिल कोहली बोलत होते. पुणे कॅम्पमधील एम. ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजमध्ये होत असलेल्या परिषदेवेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ डॉ. पी. ए. इनामदार, इंडियन एंडोडोंटिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विवेक हेगडे, उपाध्यक्ष डॉ. अजय लोगानी, महासचिव डॉ. संजय मिगलानी, दंतरोग तज्ज्ञ प्रा. डॉ. ए. पी. टिकू, ‘रंगूनवाला’चे अधिष्ठाता आर. ए. शेख, आदी उपस्थित होते.
डॉ. अनिल कोहली म्हणाले, “दातांचे आरोग्य चांगले ठेवणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. याकडे अजूनही लोक गांभीर्याने घेत नाहीत. ‘इस्थमस’ सारख्या उपक्रमांतून याबाबत जागृती होण्यास मदत होत आहे. तसेच देशभरातील विविध दंत महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि या क्षेत्रातील संशोधक, डॉक्टर संशोधन करत आहेत. दंतवैद्यक क्षेत्राला सक्षम करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परिषदेला मिळालेला प्रतिसाद आनंददायी आहे. सामान्यांना परवडेल अशी उपचार पद्धती विकसित झाली, तर लोक दातांच्या आरोग्यावर लक्ष देतील.”
डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले, “दात चांगले असतील, तर आरोग्य चांगले राहते. विद्यार्थ्यांना आपापल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याच्या उद्देशाने आम्ही शिक्षण देत आहोत. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी घडत असतात. नवे बदल, उपचार, तंत्रज्ञान जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना परिषद, कार्यशाळेतून मिळत असते. लेझर तंत्रज्ञान, दंतरोपण यासाठी अनेक विदेशी संस्थांशी आम्ही संलग्न आहोत. अशा आंतरराष्ट्रीय परिषदेतुन दंत चिकित्सेत काम करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या साठी व्यासपीठ देता आले, याचे समाधान आहे.”
डॉ. विवेक हेगडे म्हणाले, “दोन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत १५ राज्यांतून ४८ महाविद्यालयातून विद्यार्थी, प्राध्यापकांनी सहभाग घेतला आहे. ७०० लोक सहभागी झाले आहेत. २०० पेक्षा अधिक संशोधन प्रबंध सादर होत आहेत. या संशोधनातून नवे तंत्रज्ञान, उपचार आणि स्टार्टअप विकसित होण्यास मदत होईल.”
डॉ. संजय मिगलानी म्हणाले, “शैक्षणिक आणि दंतवैद्यक क्षेत्राच्या प्रगतीसाठी इंडियन एंडोडोंटिक सोसायटी सातत्याने उपक्रम राबवत आहे. या परिषदेत होणाऱ्या विचारमंथनातून दंतवैद्यकांना अनेक नव्या गोष्टी समजतील. विद्यार्थी, डॉक्टर यांनी संशोधनावर भर द्यावा.”