केंद्रीय शिक्षण मंत्रालय संचालित इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलकडून ‘फोर स्टार रेटिंग’ने सन्मान
पुणे : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत स्थापित इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलकडून पुण्यातील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला (जीएचआरआयई) इनोव्हेशनमधील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘फोर स्टार रेटिंग’ (४ पैकी ४) मिळाले आहे. यासह अटल रँकिंग इन्स्टिट्यूशन्स व इनोव्हेशन अचिव्हमेंट्समध्ये (एआरआयआयए) महाविद्यालयाला २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता बँड परफॉर्मर हा किताब मिळाला आहे. रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सुनील रायसोनी, श्रेयस रायसोनी, संचालक डॉ. आर. डी. खराडकर, सेलचे समन्वयक डॉ. प्रतिभा रेड्डी, प्रा. सारिका खोपे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले, “२०१८ मध्ये रायसोनी महाविद्यालयात इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलची स्थापना झाली. गेल्या वर्षी पाचपैकी साडेचार गुण (रेटिंग) मिळाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित, ‘नॅक’ अधिस्वीकृत आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त स्वायत्त रायसोनी महाविद्यालय इनोव्हेशन च्या बाबतीत सातत्याने अग्रस्थानी राहिले आहे. या कौन्सिलअंतर्गत गेल्या तीन वर्षात जवळपास १५० ऑनलाईन सत्रांचे आयोजन केले आहे. ‘आयपीआर’अंतर्गत महाविद्यालयाने १८९ कॉपीराईट, २४ पेटंट नोंद केले आहेत. महाविद्यालयाला सहा पेटंट, तसेच १८९ कॉपीराईट प्राप्त झाले आहेत. अवघ्या चार तासांत १०१ कॉपीराईट नोंद करण्याची कामगिरी फॅकल्टीने केली आहे. बौद्धिक मालमत्ता अधिकार, इनोव्हेशन, स्टार्टअप, उद्योजकता यावर महाविद्यालयात सातत्याने जागृती मित्रांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतात.”
“स्मार्ट इंडिया हॅकेथॉन, आयबीएम नॅसकॉम हॅकेथॉन, मंथन हॅकेथॉन आदी स्पर्धांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजस (एसपीपीयु सीआयआयएल) आयोजित विविध स्पर्धांमध्ये सातत्याने महाविद्यालय सहभाग घेते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबई, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (एनआयआयआयई) मुंबई आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) यांच्यातर्फे आयोजित इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग युथ कॉन्क्लेव्ह २०२१ मध्ये आणखी एका संघाने द्वितीय पारितोषिक मिळवले आहे. एनपीटीईएल स्वयम, एनआयटीटीटी ऑनलाईन अभ्यासक्रम उपक्रमाचे सक्रिय सभासद असलेल्या रायसोनी महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य मानांकन पटकविले आहे,” असे डॉ. आर. डी. खराडकर यांनी नमूद केले.
राष्ट्रीय हॅकेथॉन मध्ये यश
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०१७ मध्ये ‘टीम ब्रॅनिक’ने प्रथम, तर ‘टीम हेक्झा’ने पाचवा क्रमांक पटकावला होता. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आयोजिलेल्या ‘टॉयकथॉन २०२०’ जिंगल स्पर्धेमध्ये ‘शेरॉन फिलिप’ने तृतीय क्रमांक पटकावला. २०२० मध्ये आयबीएम आणि नॅसकॉम आयोजित राष्ट्रीय स्तरावरील आयबीएम हाकेथॉनमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल, अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ (एआयसीटीई) आणि ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (बीपीआरडी) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या मंथन हाकेथॉनमध्ये रायसोनीच्या ‘डिसगाइज फोर्टीस’ संघाने प्रथम क्रमांक पटकावला. रोख एक लाख, इंटर्नशिपची संधी, १० लाखांपर्यंत स्टार्ट-अप सीडफंड, राष्ट्रीय स्तरावर उत्पादन प्रदर्शित करण्याची, तसेच आगामी आंतरराष्ट्रीय हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी या संघाला मिळाली आहे.