पुणे : वाघोली येथील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ‘डीसगाईज फोर्टीप्स’ संघाने ‘मंथन हॅकेथॉन-२०२१’मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल, अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ (एआयसीटीई) आणि ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (बीपीआरडी) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच या हॅकेथॉनचे व्हर्च्युअल स्वरूपात आयोजन केले होते.
रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘पीएस-२०’ श्रेणीत प्रथम पारितोषिक जिंकले. यामध्ये ‘वास्तव आणि निनावी टीप ऑफ सादरीकरण’ होते. रोख एक लाख, इंटर्नशिपची संधी, १० लाखांपर्यंत स्टार्ट-अप सीडफंड, राष्ट्रीय स्तरावर उत्पादन प्रदर्शित करण्याची, तसेच आगामी आंतरराष्ट्रीय हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी या संघाला मिळाली आहे.
या संघात ओम खाडे, सौरव कुमार पांडे, प्रसाद चौलवार आणि आस्था कश्यप यांचा समावेश होता. प्रा. रचना साबळे व प्रा. पंकज खांबरे हे या संघाचे मार्गदर्शक होते. रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सुनील रायसोनी, श्रेयस रायसोनी, कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी विद्यार्थ्यांच्या या अतुलनीय यशाबद्दल सत्कार व अभिनंदन केले.
आपल्या गुप्तचर संस्थांसमोरील २१ व्या शतकातील सुरक्षेसंदर्भातील आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना आणि तंत्रज्ञानाचा उपाय ओळखण्यासाठी हा अनोखा उपक्रम आयोजिला होता. ही हॅकेथॉन पाच टप्प्यांत झाली. प्रत्येक टप्प्यात संघांमधील मूल्यमापन आणि परस्पर संवादावर केंद्रित करण्यात आले.
सहा संकल्पनेवरील २० आव्हानांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीप लर्निंग, ऑगमेंटेड रिॲलिटी, मशीन लर्निंगचा वापर करून डिजिटल पर्याय विकसित करणे अपेक्षित होते. सातत्याने बदलणारी आव्हाने लक्षात घेत फोटो/व्हिडिओ विश्लेषण, बनावट आशय सामग्री, निर्मात्याच्या माहितीसह ओळख, भविष्यसूचक सायबर गुन्हे याचे विश्लेषण करण्यात आले.