मॉल, अभ्यासिकांना परवानगी; दुकाने, हॉटेलचीही वेळ वाढवली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती
पुणे : शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पॉजिटिव्हिटी रेटही ५ टक्क्यांखाली आला आहे. त्यामुळे पुणे पूर्णतः अनलॉक होण्याच्या दिशेने पावले पडत आहेत. पुणे शहरातील कोरोना निर्बंधांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या सोमवारपासून कोरोना निर्बंध अधिक शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पिंपरी-चिंचवडसाठी निर्बंध अजूनही कायम आहेत.
सोमवारपासून दुकाने आता ७ वाजेपर्यंत, तर रेस्टारंट, हॉटेल १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. मॉल सोमवारपासून सुरु ठेवता येतील. तसेच अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यात येतील. चित्रपट गृहे, नाट्यगृहे मात्र बंदच राहतील, असे पवारांनी नमूद केले. दिव्यांगाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असल्याचे ते म्हणाले.
कोरोनाचा धोका अजूनही आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले असले, तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर बाळगण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.