सार्वजनिक आरोग्य सुधारण्याला महाविकास आघाडीचे प्राधान्य; पृथ्वीराज चव्हाण

सार्वजनिक आरोग्य सुधारण्याला महाविकास आघाडीचे प्राधान्य; पृथ्वीराज चव्हाण

ठेकेदार सरकारमुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्याचा बोजवारा

पृथ्वीराज चव्हाण यांचे मत;

उमेश चव्हाण लिखित ‘हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे?’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : “सध्याचे सरकार लिलावी पद्धतीचे असून, ठेकेदारी आणि कंत्राटी यंत्रणेने ग्रासलेले आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असून, लोक उपचारांअभावी तडफडून मरताहेत. सरकार मात्र, खुर्ची बचाव योजना राबवत असून, निवडणुकीच्या दृष्टीने लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना आणत आहे. हा केवळ निवडणुकीचा फार्स आहे. जनता या सगळ्या गोष्टीना वैतागली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८३ पेक्षा अधिक जागा मिळतील. आघाडी सरकार आल्यावर राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याला पहिले प्राधान्य असणार आहे,” असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

यशोदीप पब्लिकेशनच्या वतीने रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण लिखित ‘हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे?’ या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. पत्रकार भवन येथे आयोजित सोहळ्यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, माजी सहायक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे, मिलिंद गायकवाड, डॉ. अमोल देवळेकर, लेखक उमेश चव्हाण, प्रकाशक रुपाली अवचारे आदी उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “सरकारने जनतेचा पैसा निवडणूक आणि जाहिरातबाजीमध्ये घालवण्यापेक्षा सार्वजनिक आरोग्य, शिक्षण व अन्य पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी वापरावा. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या फसवणुकीला आक्षेप आहे. सरकारी दवाखान्यातील आरोग्य सेवेचा दर्जा वाढायला हवा. नागरिकांमध्ये सरकारी रुग्णालयांबद्दल विश्वास निर्माण होण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रत्येक रुग्णाची ७० टक्के जबाबदारी शासनाने घ्यावी.”


सुषमा अंधारे म्हणाल्या, “संसदीय लोकशाही रुग्णावस्थेत आहे, असे सध्याचे चित्र आहे. महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण अस्थिर झाले आहे. याच अस्थिरतेमुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. आजारी व विकृत मानसिकता देशासाठी व समाजासाठी घातक आहे. आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे. सरकारी रुग्णालयात जाण्याची भीती वाटणे, हे लज्जास्पद आहे. अवयवांची तस्करी, ड्रग रॅकेटला आळा घालणे महत्वाचे आहे. येड्याची जत्रा आणि कारभारी सतरा अशी अवस्था या सरकारची आहे. आरोग्यमंत्र्यासह इतर सर्वच मंत्री स्वतःची घरे भरण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.”

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “आरोग्य व्यवस्थेला सावध करू पाहणारे हे पुस्तक आहे. या समाज व्यवस्थेला नफेखोरी रोग जडलेला आहे. सरकार झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. त्यामुळे सामान्य जनता आजारी पडलीय. अशा काळात आरोग्य साक्षरता वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. चांगल्या, निस्वार्थ डॉक्टरांचा सहभाग वाढायला हवा. अनेक रोगांनी जर्जर झालेल्या रुग्णाला दिलासा देणारी व्यवस्था सक्षम व्हावी. आरोग्याच्या हक्काचा विचार संविधानाने दिला आहे, तो अंमलात आणणे गरजेचे आहे. सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आणि त्याला उत्तर यामध्ये दिले आहे.”

प्रास्ताविक डॉ. अमोल देवळेकर यांनी केले. रुपाली अवचारे यांनी सूत्रसंचालन केले. जानमहंमद पठाण यांनी आभार मानले.