पुणे : अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या युवक धोरण व संशोधन समितीच्या राष्ट्रीय समन्वयकपदी महाराष्ट्रातून प्रथमेश आबनावे यांची, तर हरियाणातील ऍड. उदित जगलान यांची निवड झाली आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी त्यांच्या निवडीचे पत्र दिले. आबनावे आपल्या जनसंपर्काचा, धोरणी व संशोधक वृत्तीचा उपयोग युवकांसाठी चांगले धोरण राबविण्याकरिता करतील, असा विश्वास श्रीनिवास यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच आबनावे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी, तसेच अहमदनगर ग्रामीणच्या प्रभारीपदी निवड झाली आहे. आबनावे यांच्या निवडीबद्दल शहर काँग्रेस, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ, तसेच आबनावे परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या प्रथमेश आबनावे यांनी इंग्लंड येथे कॉव्हेंट्री युनिवर्सिटीमधून स्थापत्य अभियांत्रिकी आणि प्रकल्प व्यवस्थापनाची पदवी प्राप्त केली आहे. शाळा व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविकेचे शिक्षण घेतल्यानंतर आबनावे विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित आहेत. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या विकास समितीचे अध्यक्ष, बोधी एज्युगुरु संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून शिक्षण क्षेत्रात योगदान देत आहेत. चार पिढ्या काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या आबनावे कुटुंबातील प्रथमेश आबनावे यांनी आजवर काँग्रेसच्या, तसेच संस्थेच्या माध्यमातून युवकांसाठी अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबवले आहे. प्रथमेश यांचे वडील डॉ. विकास आबनावे पुणे शहर काँग्रेसमध्ये सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. काँग्रेसच्या विचार गटात त्यांचा समावेश होता.
राष्ट्रीय स्तरावर झालेल्या या निवडीविषयी आनंद व्यक्त करत प्रथमेश आबनावे म्हणाले, “युवक धोरण व संशोधन समितीच्या समन्वयकपदी निवड होणे अभिमानास्पद आहे. या निवडीमुळे मला युवकासाठी राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळणार आहे. माझ्यावर टाकलेली ही जबाबदारी पार पडणायसाठी सर्वतोपरी मेहनत घेणार असून, देशातील युवकांच्या हिताचे धोरण आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. गांधी विचारांवर आधारित काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे विचार, दृष्टीकोन समाजातील सर्वच स्तरांत पोहचवण्यासाठी, तरुणांना काँग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी काम करणार आहे.”