‘आयसीएआय’तर्फे ३ व ४ जून रोजी दोन दिवसीय ३६ वी रिजनल कॉन्फरन्स

‘आयसीएआय’तर्फे ३ व ४ जून रोजी दोन दिवसीय ३६ वी रिजनल कॉन्फरन्स

डॉ. आनंद देशपांडे, सीए देबाशिष मित्रा यांच्या हस्ते होणार उद्घाटन सीए मुर्तुझा काचवाला यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलतर्फे (डब्ल्यूआयआरसी) दोन दिवसीय ३६ वी रिजनल कॉन्फरन्स ३ व ४ जून २०२२ रोजी पुण्यात बाणेर येथील बनतारा भवन येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती ‘डब्ल्यूआयआरसी’चे अध्यक्ष सीए मुर्तुझा काचवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ‘डब्ल्यूआयआरसी’च्या सचिव सीए श्वेता जैन, विभागीय समिती सदस्या सीए ऋता चितळे, सीए अर्पित काबरा, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे, उपाध्यक्ष सीए राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते. केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डब्ल्यूआयआरसी’चे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार यांच्या संयोजनातून ही दोन दिवसीय कॉन्फरन्स होत आहे.

सीए मुर्तझा काचवाला म्हणाले, “पुण्यात पहिल्यांदाच रिजनल कॉन्फरन्स होत आहे. ‘भविष्यासाठी सज्ज सीए’ या संकल्पनेवरील या परिषदेचे उद्घाटन ३ जून रोजी पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक व मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे, ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए देबाशिष मिश्रा, उपाध्यक्ष अनिकेत तलाठी, माजी अध्यक्ष अमरजित चोप्रा यांच्या हस्ते होणार आहे. सद्यस्थितीत जागतिक स्तरावर भारताला असलेल्या संधी’ यावर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉ. अजित रानडे मार्गदर्शन करणार आहेत. ‘भविष्यासाठी आपण सज्ज आहोत का?’ आणि ‘चौकटीबाहेरचा विचार : संधींचे भांडार’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. उद्योग व सनदी लेखापाल क्षेत्रातील तद्जन्य आपले विचार मांडणार आहेत.”

“दुसऱ्या दिवशी करप्रणालीवर सीए गिरीश अहुजा, जीएसटीमध्ये काय करावे व करू नये यावर ऍड. सीए व्ही. श्रीधरन, देशातील बदलते प्रशासनवर पी. आर. रमेश बोलणार आहेत. तसेच ‘भागीदारांच्या अपेक्षा आणि सीएंची भूमिका’ व ‘सद्यस्थितीतील भांडवली बाजार’ या विषयांवर चर्चासत्र होणार असून, विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.”

या कॉन्फरन्समध्ये सनदी लेखापाल क्षेत्रातील नवतंत्रज्ञान, विविध प्रणाली, त्याचे स्वरूप आदींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, असे सीए ऋता चितळे यांनी नमूद केले. अधिकाधिक सनदी लेखापालांनी या परिषदेसाठी नावनोंदणी करावी. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी http://www.puneicai.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन पठारे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *