वैविध्यपूर्ण काव्य सुमनांनी रसिक मंत्रमुग्ध

वैविध्यपूर्ण काव्य सुमनांनी रसिक मंत्रमुग्ध

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताहानिमित्त निमंत्रितांचे काव्य संमेलन
अंतरंगातून साकारलेली साहित्यकृती सकस : प्रकाश रोकडे
कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताहानिमित्त राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व मराठी विभागातर्फे काव्य संमेलन
पुणे : मराठीचा अभिमान जागवणारी ‘मनामनाला साद घालते आमुची मराठी’ ही कविता… भावनांना वाट करून देणाऱ्या ‘अंतरीच्या भावनांचा बांध हा फुटणार आहे’, ‘वास्तवाच्या विस्तवाला जळताना पाहिले’, ‘आठवांचे काळे मेघ, जेव्हा उरी दाटतात’, ‘या जीवांनी त्या जीवांचे दुःख जाणले पाहिजे’ या रचना… आईची महती वर्णन करणाऱ्या ‘आई फक्त तुझ्याचसाठी’, ‘होतीस तू काल म्हणूनी मी या जगात आहे आई’, ‘आईतला बाबा’ या कविता… कोरोना आणि लॉकडाऊनचे परिणाम सांगणाऱ्या ‘त्या दिवसाची आठवण मला रोज येते’, ‘देव-देवतांचे अस्तित्व’, ‘कोरोनाचा कहर, राजकारण्यांची लहर’, ‘देऊळ बंद’ या रचना… 
 
‘बालपणीच्या आठवणी येता’ ही बालपण सांगणारी, तर ‘माझा आत्मसन्मान ठेचाळतो अन रक्ताळतो’ ही स्त्री-जीवनाचे वर्णन करणारी कविता… ‘पहिला क्षण मिरगाचा, पहिला क्षण आनंदाचा’ ही निसर्ग सौंदर्य दाखवणारी, तर ‘दोन बैलांचा नांगर हाकणारा तिसरा बैल’ ही शेतकऱ्याची व्यथा मांडणारी कविता… ‘पावसाची सर, झालाय कहर’मधून पावसाचे वर्णन, तर ‘रक्तात तुझ्या साखर निघते मनभर सखया’, ‘मोहब्बत को रखना हमेशा बचाकर’ या प्रेमकविता… ‘श्रद्धा, भक्ती, प्रेम तुम्हावर, ध्यासही तुमचा आहे’ गुरु-शिष्याचे नाते सांगणारी कविता रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली.
 
निमित्त होते, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताहानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आयोजित काव्यसंमेलनाचे! राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने शनिवारी झालेल्या या काव्यसंमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ साहित्यिक आणि राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे अध्यक्षस्थानी होते. विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय नगरकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. ज्येष्ठ कवी शंकर आथरे यांनी निवेदन केले.
 
प्रकाश रोकडे म्हणाले, “प्रतिभा ही कोणाची मक्तेदारी नाही, की वारसा हक्कानेही मिळत नाही. वाचन, चिंतन आणि निरीक्षणातून ती अर्जित करावी लागते. अनुभव आणि अनुभूती त्यासाठी उपयुक्त ठरते. शब्दांच्या उपासनेतून शब्दभांडार संपन्न होते. अस्वस्थ झाल्याशिवाय किंवा एखाद्या गोष्टीबद्दल कळवळा आल्याशिवाय लेखन करू नका. तसे झाल्यास लिहिण्याचे थांबू नये. अंतरंगातून साकारलेली कथा, कविता किंवा कोणतीही साहित्यकृती अधिक सकस होते.”
 
या कवींचा सहभाग
या संमेलनात ज्येष्ठ कवी मधुश्री ओव्हाळ, चंद्रकांत धस, मीना शिंदे, राजेंद्र कांबळे, डॉ. सविता पाटील, प्रा. नलिनी पाचर्णे, प्रा. दीपिका कटरे, चंद्रकांत सोनवणे, तेजस राजिवडे, वैशाली भालेराव, रुपाली शिंदे, दुर्वा वाघमारे, अक्षय होनकर, विशाखा भगत, ओंकार जोशी, रुपाली शिंदे, दिव्या जोशी, संतोष घुले, अरुणा साबळे आदींनी कविता सादर केल्या. प्रकाश रोकडे, चंद्रकांत वानखेडे, प्रा. डॉ. संजय नगरकर, शंकर आथरे यांनीही कविता सादर करत श्रोत्यांची मने जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *