विद्याधर अनास्कर यांचे मत; ‘सूर्यदत्त’मध्ये ऑस्टिओपॅथी उपचार शिबीराचे उद्घाटन
पुणे : “कोणतीही तपासणी, औषधे किंवा शस्त्रक्रिया न करता केवळ शरीराच्या रचनांचा अंदाज घेत उपचार करणारी ही ऑस्टिओपॅथी थेरपी आहे. गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार, स्पाँडेलिसिस यांसारख्या असाध्य आजारावर ही थेरपी महत्वपूर्ण आहे. संगणक, मोबाईलच्या वापरामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे बळावत असलेल्या आजारांवर हा महत्वाचा उपाय आहे. भारतीय पारंपरिक चिकित्सा प्रणाली आहे. १९ व्या शतकात ही विद्या भारतातून लुप्त होत अमेरिकेत स्थिरावली. आज एकट्या अमेरिकेत या पॅथीची १५०० विद्यापीठे आहे. पुन्हा एकदा ऑस्टिओपॅथीला भारतात आणून भारतवासीयांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे. जवळपास ६० केंद्राच्या माध्यमातून याचा प्रचार व प्रसार आम्ही करत आहोत,” असे मत प्रसिद्ध ऑस्टिओपॅथी तज्ज्ञ डॉ. गोवर्धनलाल पराशर यांनी व्यक्त केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन संचलित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट अंतर्गत सूर्यदत्त इन्स्टिटयूट ऑफ अल्टरनेटीव्ह थेरपीज अँड रिसर्चच्या वतीने ३० एप्रिल ते २ मे २०२२ या कालावधीत आयोजित ऑस्टिओपॅथी तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन शनिवारी झाले. डॉ. गोवर्धनलाल पराशर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून असाध्य रोगांनी ग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात आले. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या शिबिरावेळी ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, सल्लागार सचिन इटकर, मधुसूदन पराशर, गौरव पराशर, स्नेहल नवलाखा, सुनील महाजन, प्रा. सुनील धाडीवाल, प्रा. प्रशांत पितालिया, डॉ. सिमी रेठरेकर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या प्रेरणेतून हे शिबीर आयोजिले आहे.
डॉ. गोवर्धनलाल पराशर म्हणाले, “या पॅथीत रक्ताभिसरण प्रक्रिया व्यवस्थित करून रोगमुक्त करण्याची क्षमता आहे. आजाराचे मूळ शोधून त्यावर इलाज करण्याची गरज असते. ऑस्टिओपॅथीमध्ये हीच गोष्ट केली जाते. यामध्ये सांध्यांची रचना पूर्ववत केली जाते. कंकाल आणि स्नायूंच्या हाताळणी आणि मालिश द्वारे वैद्यकीय विकारांवर उपचार समाविष्ट असलेल्या पूरक औषधांची एक प्रणाली आहे. ऑस्टियोपॅथी ही ‘ऑक्सफर्ड ऍडव्हान्स्ड लर्नर्स डिक्शनरी’नुसार एक स्वतंत्र उपचार पद्धती आहे. ऑस्टिओपॅथी ही हाडे आणि स्नायू आणि मज्जातंतूंच्या नियमन (फेरफार) आणि नियंत्रित हालचालीद्वारे रोगांवर उपचार करण्यासाठी एक वैद्यकीय उपचार आहे. हाडे आणि स्नायू ढकलून आणि हलवून आजारी किंवा वेदना झालेल्या लोकांवर उपचार करण्याची पद्धत आहे.
विद्याधर अनास्कर म्हणाले, “ऑस्टिओपॅथी ही अतिशय परिणामकारक आहे. त्याचा स्वतः अनुभव घेत आहे. कोणत्याही गोळ्या-औषध किंवा शास्त्रक्रियेविना आजार वा दुखणे बरे करण्याची किमया या पॅथीमध्ये आहे. त्यामुळे या पॅथीच्या उपचाराची केंद्रे सर्वत्र व्हावीत. अभ्यासक्रम मान्यता प्राप्त व्हावा. भारतात या थेरपीला मान्यता देऊन सर्वांपर्यंत पोहोचावी.”
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, “एक रुग्ण म्हणून उपचार घेतला. दुखऱ्या नसांना अगदी दोन बोटांनी दाब देत आजार बरा करण्याची ही कला अद्भुत आहे. पाठीच्या, गुडघ्याच्या दुखण्यावर १५ मिनिटात मला फार हलके वाटत आहे. दुखणे सहज बरे करणारी अशी उपचार शिबिरे व्हायला हवीत. सामान्य लोकांना, गरिबांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “श्री संवरलाल ऑस्टियोपॅथी चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून डॉ. गोवर्धनलाल पाराशर महत्वपूर्ण काम करत आहे. आजपर्यंत जगभरात ४५०० हून अधिक मोफत शिबिरे आयोजिली आहेत. स्लिप डिस्क आजाराने पीडित असंख्य लोकांना त्यांनी पुन्हा चालायला लावले आहे आणि हाडे, स्नायू आणि मज्जातंतूच्या विकाराच्या असंख्य रुग्ण कोणत्याही औषधाशिवाय बरे केल्या आहेत. त्यांचे विशेष शिबीर सूर्यदत्तमध्ये आयोजिले आहे. या शिबिराला ३००० लोकांनी प्रतिसाद दिला आहे. ही उपचारपद्धती पुण्यात विकसित व्हावी, यासाठी डॉ. पराशर यांनी सूर्यदत्तमध्ये केंद्र सुरु करण्याची अनुमती दिली असून, आमच्या डॉक्टरांना याचे प्रशिक्षण देण्याचे आश्वस्त केले आहे.”
“संधिवात, पाय, घोटा, नितंब आणि गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी आणि सायटिका, हात, खांदा आणि कोपर दुखणे, डोकेदुखी, स्पाइन फ्लुइड लीकेज, हात आणि पाय सुन्न होणे, हाताचा थरकाप, स्प्रेन इजा, स्लिप डिस्क, अस्थिबंधन दुखणे आणि फाटणे, पेन डाउन समस्या, हाडांची अव्यवस्था, स्पॉन्डिलायसिस, टेनिस आणि गोल्फर कोपर, घोटा आणि पाय दुखणे, गर्भधारणा, क्रीडा इजा, ड्रायव्हिंग किंवा कामाचा ताण, किंवा पचन समस्यांमुळे पोस्चर समस्या, मायग्रेन, लुम्बॅगो आणि सायटिका आदी आजारांवर ही थेरपी प्रभावी ठरते. ऑस्टिओपॅथी ही एक औषध-मुक्त, नॉन-इनवेसिव मॅन्युअल थेरपी आहे. ज्याचा उद्देश मस्कुलोस्केलेटल फ्रेमवर्कमध्ये फेरफार करून आणि मजबूत करून सर्व शरीर प्रणालींमध्ये आरोग्य सुधारणे आहे. एक ऑस्टिओपॅथीमध्ये सांधे, स्नायू आणि मणक्यावर लक्ष केंद्रित केले जाते,” असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.
या शिबिराच्या निमित्ताने ‘सूर्यदत्त’च्या फिजिओथेरपीच्या पहिल्याच बॅचमधील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रत्यक्ष शिबिराचा, तसेच डॉ. पराशर यांच्या मार्गदर्शनाचा अनुभव घेता आला. ‘सूर्यदत्त’मधील दोन डॉक्टर जोधपूर येथे जाऊन डॉ. पराशर यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन आले आहेत. जोधपूरला जाऊन उपचार घेतलेले अनेक रुग्ण येथे आले होते. त्यांनी डॉ. पराशर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. सचिन इटकर यांनी आभार मानले.
पुणे परिसरातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पीडितांना ऑस्टिओपॅथी उपचार पद्धतीची गरज आहे. मात्र, वेळेअभावी यावेळी अनेकांची नोंदणी घेतली जाऊ शकत नाही. असेच शिबीर जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्याचा विचार असून, त्यासाठी या शिबिराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी मोफत नाव नोंदणी www.suryadatta.org या वेबसाईटवर करावी. किंवा support@suryadatta.edu.in यावर ईमेल करावा.