सुधीर इनामदार यांचे मत; वंचित विकासतर्फे ‘इंदिरा गोविंद’ पुरस्काराचे वितरण

सुधीर इनामदार यांचे मत; वंचित विकासतर्फे ‘इंदिरा गोविंद’ पुरस्काराचे वितरण

मुलांमध्ये लेखन-वाचन संस्कृती जोपासायला हवी
सुधीर इनामदार यांचे मत; सुश्री फाउंडेशन, वंचित विकासतर्फे पारितोषिक वितरण समारंभ
 
पुणे, ता. ३: “आधुनिक साधनांच्या उपलब्धतेमुळे मुलांमधील लेखन व वाचनाची आवड कमी होत आहे. भावी पिढीचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, तर मुलांमध्ये लेखन-वाचन संस्कृतीची जोपासना करायला हवी. यासाठी ‘निर्मळ रानवारा’सारखे व्यासपीठ उपयुक्त आहे,” असे मत पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यवाह सुधीर इनामदार यांनी व्यक्त केले. योग्य-अयोग्य याचा विचार न करता आपण लिहीत राहावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
 
सुश्री फाउंडेशन आणि वंचित विकास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात इनामदार बोलत होते. यावेळी वि. ल. शिंत्रे कथा स्पर्धेचे पारितोषिक, इंदिरा गोविंद पुरस्कारांचे वितरण व ‘निर्मळ रानवारा’च्या कथा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. भावे हायस्कुलमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अभिजात माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पूर्वाताई म्हाळगी, वंचित विकासच्या संचालिका सुनीता जोगळेकर, सहकार्यवाह देवयानी गोंगले, माजी नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे, ‘निर्मळ रानवारा’च्या मुख्य संपादक ज्योती जोशी, श्रीराम ओक आदी उपस्थित होते. 
 
पुणे मराठी ग्रंथालयाच्या सहकार्याने झालेल्या या कथा स्पर्धेत मोठ्या गटात किशोरी उपाध्ये, माधवी सोमण, स्वाती देशपांडे, तर छोट्या गटात रावी कडू, श्रुती गोखले व मैथिली दामले यांचा गौरव करण्यात आला. ‘निर्मळ रानवारा’मध्ये लेखन, चित्राच्या माध्यमातून सहभागी झालेल्या १४ मुलांना ‘इंदिरा गोविंद पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. माधुरी सहस्रबुद्धे यांना अमरेंद्र जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल वंचित विकासतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
 
सुधीर इनामदार म्हणाले, “मुलांनी सतत लिहीत व वाचत रहावे. त्यातून तुमच्या लिखाण कौशल्यात सुधारणा होते. पालकांनीही आपल्या मुलांना लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करावी. पालकांचे अनुकरण करीत मुलेही मोबाईल, इंटरनेटचा अतिवापर करतात. ही सवय मोडून पालकांनी मुले अवतीभवती असताना मोबाईलचा वापर टाळावा. मुलांमध्ये रमून त्यांच्यासोबत नवनवीन गोष्टी कराव्यात. त्यातून मुलेही मोबाइलपासून दूर राहण्यास मदत होईल.”
 
पूर्वाताई म्हाळगी म्हणाल्या, “लेखन स्पर्धेत मोठ्यांबरोबर चिमुकल्यांनीही नोंदवलेला सहभाग आनंददायी आहे. या वयात मुलांना लिहिण्याची सवय लागणे उत्तम गोष्ट आहे. मुलांसह पालकांनीही लेखन-वाचनाची सवय लावून घेतली, तर मुलांवर त्याचा चांगला परिणाम होतो. ‘पालक शाळा’ ही संकल्पना रुजायला हवी. स्वतः पालकांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन उपक्रमशील गोष्टींचा अनुभव घ्यावा. त्यातून मुलांचा स्क्रीनटाईम कमी होईल. मुलांच्या प्रत्येक गोष्टीत पालकांनी सहभाग वाढवावा. ‘निर्मळ रानवारा’ हे मुलांमधील लेखक घडण्यासाठी चांगले व्यासपीठ आहे.”
 
स्वागत प्रास्ताविक श्रीराम ओक यांनी केले. सूत्रसंचालन तृप्ती फाटक यांनी केले. देवयानी गोंगले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *