पुणे : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून निवड झाली आहे. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील त्यांचा अनुभव व योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या वतीने ही निवड झाली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ही निवड असणार आहे. प्रा. डॉ. चोरडिया यांच्यासह वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातून डॉ. अनिल कुलकर्णी, तर संशोधन क्षेत्रातून उदित शेठ यांचीही निवड झाली आहे.
प्रा. डॉ. संजय चोरडिया हे उत्तम व्यवस्थापन व्यावसायिक, प्रशिक्षक, सर्जनशील शिक्षणतज्ज्ञ व समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त करून त्यांनी मार्केटिंग मॅनेजमेंट, मटेरिअल्स मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यामध्ये पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले आहे. एन्व्हायरमेंट सायन्समध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे.
ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रात वरिष्ठ पदांवर त्यांनी काम केले आहे. धोरणात्मक निर्णय, नवतंत्रज्ञानाचा समावेश, बिझनेस प्रक्रिया, खर्चाचा लेखाजोखा, ईआरपी यंत्रणा, यासह नवीन उत्पादनांची निर्मिती, व्हेंडर डेव्हलपमेंट, खर्च कपात, नवीन प्रकल्प, प्रशिक्षण आणि विकास यामध्ये त्यांचा सहभाग असे. अनेक नवीन स्टार्टअप सुरु करण्यात त्यांचा पुढाकार असतो. मर्सिडीज बेन्ज, फ्लॅक्ट स्वीडन, डीमाग जर्मनी, रोलँड बर्गर, प्राईस वॉटर हाऊस कूपर, बोस्टन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अशा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या समवेत त्यांनी नवीन प्रकल्प सुरु करण्यात योगदान दिले आहे. गेल्या २० वर्षात रोज सरासरी १२ ते १४ तास प्रा. डॉ. चोरडिया कार्यरत आहेत.
सरकारी पातळीवरच्या विविध तज्ज्ञ समित्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध व्यावसायिक संस्थामध्ये ते सक्रिय सदस्य आहेत. सेंटर फॉर एजूकेशन अँड रिसर्च, नवी दिल्ली या संस्थेमध्ये अलिकडेच त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. गेल्या वर्षभरामध्ये त्यांनी ५० नवे स्टार्टअप व संस्था स्थापित केल्या आहेत. कच्चा मालासंबंधी ऑटो इंडस्ट्रीच्यामध्येही सदस्य म्हणून शासकीय पातळीवर त्यांनी काम पाहिले आहे. ऑटो इंडस्ट्रीज डिपार्टमेंट, टेलिफोन अडवायझरी कमिटी, रॉ मटेरियल प्लॅनिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स करिक्युलम, मिनिस्ट्री ऑफ स्टील इंडस्ट्रीज यासह सीआयआय, नॅसकॉम, असोचेम, जीएनआय, आयएमसी, एमसीसीएआय या संस्थांवर ते कार्यरत आहेत.
औद्योगिक मंत्रालयाअंतर्गत औद्योगिक विकास विभागामध्ये धोरण आणि नियोजन सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. स्टील उद्योग मंत्रालय, ॲटोमोबाईल उद्योगाकरिता सदस्य म्हणून कार्यभार पाहिला आहे. पुणे विभाग टेलीफोन ऍडव्हायझरी कमिटी सदस्यपदीही त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रांचा त्यांचा अनुभव आहे. बजाज टेम्पो माणि फोर्स मोटर्स येथे २० वर्षाहून अधिक काळ त्यांनी सेवा बजावली आहे.
आपण आजवर उद्योग क्षेत्रात केलेल्या कार्याची योग्य दखल घेतली गेल्याची प्रतिक्रिया प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी व्यक्त केली. तसेच राज्यपाल, महाराष्ट्र राज्य तथा कुलपती यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपण योग्य प्रकारे पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा योग्य भरारी घेण्याचा हा काळ आहे. या काळानुरूप आपण आपले सेवा कार्य सुरू ठेवू, असेही त्यांनी नमूद केले.