महात्मा फुले जयंतीदिनी पुण्यात तयार झाली तब्बल ‘दहा हजार किलोची मिसळ

महात्मा फुले जयंतीदिनी पुण्यात तयार झाली तब्बल ‘दहा हजार किलोची मिसळ

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने आयोजन ; अयोध्येत विश्वविक्रमी शिरा बनविण्यासाठी वापरलेली भव्य कढई पहिल्यांदाच मिसळ करण्याकरिता पुण्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी वापरली

पुणे : तब्बल १५ बाय १५ फूट आणि ६.५ फूट उंच अशा तब्बल २५०० किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये पुण्यात १० हजार किलो मिसळ तयार करण्यात आली. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम गंज पेठेतील महात्मा जोतीबा फुले वाडा येथे राबविण्यात आला.

अयोध्येत तब्बल ७ हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही १० हजार किलो मिसळ तयार केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मुरलीधर मोहोळ, बाळासाहेब शिवरकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देत एकत्रितपणे मिसळीचा आस्वादही घेतला. प्रल्हाद गवळी, श्रीधर चव्हाण, नंदा पंडित, सारंग सराफ, रवी चौधरी, सुशीला नेटके, विजय रजपूत, एकनाथ ढोले, बाळासाहेब अमराळे, सुनीता काळे, संतोष पंडित, पीयूष शहा, रुपेश चांदेकर, महेंद्र मारणे आदींनी आयोजनात सहभाग घेतला.

उपक्रमामध्ये १० हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी १००० किलो, कांदा ८०० किलो, आलं २०० किलो, लसूण २०० किलो, तेल ७०० किलो, मिसळ मसाला १४० किलो, लाल मिरची पावडर ४० किलो, हळद पावडर ४० किलो, मीठ ५० किलो, खोबरा कीस १४० किलो, तमाल पत्र ७ किलो, फरसाण २५०० किलो, पाणी १०००० लिटर, कोथिंबीर १२५ जुडी, लिंबू १००० नग इत्यादी साहित्य वापरण्यात आले. तसेच मिसळ खाण्याकरिता डिस्पोजेबल डिश ५० हजार, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास ५० हजार यांसह स्लाईड ब्रेड १.५ लाख नग असे साहित्य वापरण्यात आले आहे.

पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरु केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरीता आदर्श ठरत असतो. त्यामुळेच यंदा सलग दुस-या वर्षी आगळ्या – वेगळ्या पध्दतीने लोकसहभागातून एकूण २० हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आहे. लोकसहभाग असला की कितीही मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते, अशी हजारो उदाहरणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत या समाजात पहायला मिळतात. याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या जयंती निमित्त पुणेकरांच्या सहभागातून ही दहा हजार किलोची मिसळ बनविण्यात आली. दिनांक १४ एप्रिल रोजी पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे देखील १० हजार किलो मिसळ व ताक तयार करुन अभिवादनाकरीता येणा-या बांधवांना वाटप करण्यात येणार आहे. दि. १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ पासून हे वाटप केले जाईल.

पुण्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांनी उपक्रमात सहभाग घेतला आहे. मिसळ हे निमित्त आहे, एकत्र येण्याचे आणि महापुरुषांना वंदन करण्याचे. तरी सर्वांनी या उपक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *